सांंगली : हुकूमशाहीच्या दिशेने निघालेल्या फसव्या प्रवृत्तीला खड्यासारखे बाजूला करण्याची संधी मतदानाच्या रूपाने साधावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी बुधवारी शिराळा येथे झालेल्या जाहीर सभेत केले. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ बुधवारी शिराळा येथे पवार यांची सभा पार पडली. यावेळी उमेदवार पाटील यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये सत्तेवर येत असताना पेट्रोल, गॅसचे दर कमी करण्याचे आश्‍वासन जनतेला दिले होते. मात्र, प्रत्यक्षात इंधनाचे दर वाढले आहेत. वर्षाला दोन कोटी युवकांना नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र आयएलओच्या अहवालानुसार शिक्षणानंतर बाहेर पडणारे शंभरपैकी ८७ तरुण आज रोजगाराच्या शोधात असून त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आश्‍वासन न पाळणार्‍यांना प्रश्‍न विचारण्याचा आपल्या सर्वाना अधिकार आहे.

हेही वाचा – शरद पवारच माझे मुख्य प्रचारक – उदयनराजे

केंद्र सरकारला प्रश्‍न विचारले, विरोध केला तर विरोधक म्हणून त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मात्र, प्रश्‍न सोडविण्याऐवजी दिल्ली आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी काही प्रश्‍न उपस्थित केले तर त्यांना तुरुंगात टाकले. ही हुकूमशाही वृत्तीच आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आम्ही घटना बदलणार नाही असे सांगत असले तरी त्यांचेच सहकारी ४०० खासदार निवडून आले तर आम्ही घटनेत बदल करू यासाठी मोदींना ताकद द्या असे सांगत आहेत. संविधान बदलाचा हा डाव आपण ओळखला पाहिजे. यासाठी हुकूमशाही आणि फसवी प्रवृत्ती खड्यासारखी बाजूला करण्याची आज गरज आहे.

हेही वाचा – संभाजीराजेंना राज्यसभेची उमेदवारी ठाकरेंनी का नाकारली? ‘त्या’ ड्राफ्टमध्ये काय होतं? उदय सामंतांचा गौप्यस्फोट

तेलंगणा, कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे. काँग्रेसने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता या राज्यात केली आहे. यामुळे फसव्या आश्‍वासनाला बळी न पडता हुकूमशाही वृत्ती दूर सारण्यासाठी एकत्र आलेल्या आघाडीच्या पाठीशी राहावे असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

Story img Loader