Sharad Pawar in Massajog Viilage Beed statement on Santosh Deshmukh murder case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या घटनेचे विधानसभा व लोकसभेतही पडसाद उमटले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांनी विधानसभेत तर, खासदारांनी लोकसभेत हा विषय मांडून न्यायाची मागणी केली. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर यांना घेऊन मस्साजोग गावात दाखल झाले. पवारांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. तसेच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला शिक्षा होईपर्यंत आमचे शिलेदार स्वस्थ बसणार नाहीत असंही सांगितलं.
शरद पवार म्हणाले, “बीड जिल्ह्यात जे काही घडलं ते कोणालाही न पटणारं आणि सहन न होणारं आहे. ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली आहे त्यांनी गेली १५ वर्षे इथल्या लोकांसाठी भरपूर काम केलं आहे. त्यांनी लोकसेवेचे काम केल्यामुळेच लोकांनी १५ वर्षे त्यांची निवड केली. तो तरुण सरपंच येथील लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाशी समरूप होणारा होता. वादविवादापासून दूर राहणारा होता. असा हा तरुण कर्तबगार लोकप्रतिनिधी तुमच्या गावात काम करत होता. परंतु, येथील कोणाला तरी दमदाटी झाली आणि त्या प्रकरणी चौकशी करत असताना चौकशी करण्याची भूमिका का घेतली म्हणून बाहेरून कोणीतरी येतो आणि त्यांच्यावर हल्ला करतो. हा हल्ला शेवटी त्यांच्या हत्येपर्यंत जातो हे अतिशय गंभीर प्रकरण आहे. राज्य सरकारला व केंद्र सरकारला याची नोंद घ्यावीच लागेल.
हे ही वाचा >> “तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरुपांनी…”, अशोक चव्हाणांचा तो फोटो पाहून ठाकरे गटाचा संताप; म्हणाल्या, “खायचं कुडव्याचं अन्…”
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख म्हणाले, लोकसभेचे अधिवेशन नुकतंच संपलं आहे. तुमचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके यांनी हा विषय लोकसभेत मांडला आणि न्यायाची मागणी केली. बजरंग सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकसभेत केलेली भाषणं मी ऐकली. ते पाहून या देशात, या राज्यात काय चाललंय असा प्रश्न देशभरातील प्रसारमाध्यमं विचारू लागले आहेत. तुमचं दुःख जिथे मांडायला हवं तिथे तुमच्या लोकप्रतिनिधींनी मांडलं आहे. आता सरकारने याच्या खोलात जायला हवं. याचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याच्या मुसक्या आवळायला हव्यात. हल्लेखोर व त्याचा कोणाशी संवाद चालू होता ही सगळी माहिती बाहेर काढली पाहिजे. वस्तूस्थिती समोर आणली पाहिजे.