बिहारमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी मंगळवारी भाजपाला पुन्हा धक्का दिला़  भाजपाशी काडीमोड घेत त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) मुख्यमंत्री म्हणून राजीनामा देऊन राष्ट्रीय जनता दलासह (राजद) अन्य घटकपक्षांच्या महाआघाडीचे नेते म्हणून आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याच राजकीय घडामोडीचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींशी जोडत भाजपावर टीका केली आहे. शरद पवार यांनी आज पत्रकारांशी चर्चा करता श्रीलंकेपासून ते बिहारमधील राजकीय घडामोडीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना दुबळी करण्याचं नियोजन भाजपाने केलं आणि त्याला एकनाथ शिंदे व इतर लोकांनी मदत केल्याचं मत व्यक्त केलं आहे.

नक्की वाचा >> Photos: “…म्हणून संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला”; पूजा चव्हाण प्रकरणावरुन टीकेच्या पार्श्वभूमीवर CM शिंदेंचा खुलासा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रीलंकेतील परिस्थितीचा केला उल्लेख
“श्रीलंकेत एकाच कुटुंबाची अनेक वर्षे सत्ता होती. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री या सगळ्या सत्तेचे केंद्रीकरण त्याठिकाणी झाले. ते होत असताना लोकांच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालण्याची जी नेतृत्वाची जबाबदारी होती ती हवी त्या प्रमाणात पाळली गेली नाही. त्यामुळे श्रीलंकेत असंतोष वाढायला लागला. हा असंतोष एका दिवसाचा किंवा एका महिन्याचा नाही तर गेले काही महिने सतत असंतोष वाढत होता. परिणामी अखेर उद्रेक झाला आणि तिथे राज्यकर्त्यांना सत्ता सोडावी लागली. आज भारताच्या दृष्टीने आजूबाजूच्या देशांमध्ये अंतर्गत परिस्थिती नीट राहणे गरजेचे आहे. ज्यावेळी राज्याचे नेतृत्व हे मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीत अयशस्वी होते तेव्हा श्रीलंकेत जे घडले आहे तशी परिस्थिती दिसते,” असं पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ४४ हजार २७० कोटींचा मालक आहे शिंदे सरकारमधील ‘हा’ मंत्री; पहिल्यांदाच मंत्रीमंडळामध्ये मिळालं आहे स्थान

आपण सावध राहण्याची आवश्यकता
“हेच आज आपल्याला बांग्लादेशमध्ये दिसायला लागलेय. कदाचित पाकिस्तानमध्ये सुद्धा हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याची नोंद देशाच्या राज्यकर्त्यांनी विशेषत: नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील सर्व घटकांनी घेण्याची अत्यंत गरज आहे. जिथे सत्ता केंद्रीत झाली तिथे हे प्रश्न निर्माण झाले. भारतामध्ये सत्ता राष्ट्रीय पातळीवर केंद्रीत होईल का अशी शंका लोकांच्या मनात येत आहे. आज तसे चित्र दिसत नाही, परंतु आपण सावध राहण्याची आणि काळजी घेण्याची आवश्यकता आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलंय.

नक्की पाहा >> Photos: ‘एकनाथ कुठं आहे?’, ‘महाशक्ती तुमच्या पुढे गेली शिंदे साहेब’, ‘फडणवीसांसमवेत पहिली रांग अन्…’; दिल्लीतील ‘तो’ फोटो चर्चेत

शिवसेना दुबळी करण्यासाठी शिंदेंनी मदत केली
“भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी मध्यंतरी भाषणात स्पष्ट सांगितले की, प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही. ते शिल्लक राहणार नाहीत. आमचा एकच पक्ष देशात शिल्लक राहील. नितीशकुमार यांची तक्रार आहे की, भाजपासोबत असलेल्या पक्षांना हळूहळू संपवत आहे. त्याचे उदाहरण म्हणजे पंजाबमधील अकाली दल हा मोठा पक्ष त्यांच्यासोबत होता. तो पक्ष त्यांनी जवळपास संपुष्टात आणला आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा अनेक वर्ष एकत्र होते. आज शिवसेनेचे विभाजन करून शिवसेना दुबळी कशी करता येईल याची आखणी भारतीय जनता पार्टीने केली. त्याला एकनाथ शिंदे आणि इतर लोकांची मदत झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवसेनेवर एकप्रकारचा आघात त्यांच्या एकेकाळच्या मित्रपक्षाने केला. हेच चित्र बिहारमध्ये दिसत होते,” असं पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “भाजपाच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये…”; राठोड यांच्या मंत्रीपदावरुन फडणवीसांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपाला केलं लक्ष्य

बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले
“नितिश कुमार हे लोकमान्यता असलेले नेतृत्व आहे. मागील निवडणुकीत नितिश कुमार आणि भाजपा एकत्र लढले. परंतु भाजपाचे अजून एक वैशिष्ट्य असे आहे की ते निवडणुकीत एकत्र येतात आणि मित्रपक्षाचे लोक कसे कमी निवडून येतील याची काळजी घेतात. हे महाराष्ट्रातही घडले. असेच चित्र बिहारमध्येही दिसायला लागले. बिहारचे मुख्यमंत्री वेळीच सावध झाले आणि भाजपापासून दूर होण्याची भूमिका त्यांनी घेतली,” असं पवार यांनी बिहारमधील राजकीय घडामोडींबद्दल मत व्यक्त करताना सांगितलं.

नक्की वाचा >> “पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्राला…”; हिंगोलीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदेंचं नीति आयोगाची बैठक, हजारो कोटींचा उल्लेख करत विधान

पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय
“आज भाजपाचे नेते त्यांच्याबद्दल टीकाटिप्पणी करत आहेत पण नितिश कुमार यांनी टाकलेले पाऊल अत्यंत शहाणपणाचे आहे. उद्या जे संकट भाजपा त्यांच्यावर आणणार आहे त्याची वेळीच नोंद घेऊन त्यांनी खबरदारी घेतली. त्यांनी राज्याच्या आणि त्यांच्या पक्षाच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय घेतला,” असंही पवार यांनी म्हटलं आहे.

संसद चालविण्यासंबंधीची आस्था केंद्र सरकारमध्ये नाही
“आमची अपेक्षा होती की १२ तारखेपर्यंत संसदीय अधिवेशन चालेल. पण संसद चालविण्यासंबंधीची आस्था केंद्र सरकारमध्ये आहे असे गेल्या काही वर्षांत आम्हाला जाणवलेले नाही. ज्यावेळी संधी मिळेल तेव्हा ते अधिवेशन बंद करतात, चर्चेचा मार्ग बंद करतात. लोकांना आपली मतं मांडण्याची संधी जी सदनामधून मिळते ती थांबवतात आणि आपल्याला हवे तसे काम करतात. लोकसभा आणि राज्यसभा कामकाज लवकर बंद करण्यातून हे पाहायला मिळाले,” असा टोलाही पवार यांनी लगावला.

नक्की वाचा >> “संजय राठोडला मंत्रीपद देणं दुर्दैव, तो मंत्री झाला असला तरी…”; भाजपाच्या चित्रा वाघ मंत्रिमंडळ विस्तार सुरु असतानाच संतापल्या

हर घर तिरंगाला पाठिंबा
“स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त एक राष्ट्रीय समिती बनली असून त्याचा मी देखील सभासद आहे. या समितीच्या बैठकीत हर घर तिरंगा फडकाविण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रध्वज फडकाविण्यात कोणालाही अभिमान वाटेल. हा पक्षीय प्रश्न नाही. हा राष्ट्राचा ध्वज आहे. त्याचा सन्मान या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने करायच्या कल्पनेला आमची साथ आहे,” असं पवार यांनी म्हटलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar says bjp divide shivsena with help of eknath shinde scsg