नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठं अपयश पाहावं लागलं. तर महाविकास आघाडीने राज्यात महायुतीला मोठा दणका दिला. प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाने १० जागा लढवून त्यापैकी ८ जागा जिंकून दाखवल्या. या यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेते शरद पवार गटाच्या संपर्कात असून अनेक नेते लवकरच स्वगृही परततील असे दावे शरद पवार गटातील आमदार आणि नेते करत आहेत. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, अजित पवार गटातील नेते जयंत पाटलांच्या (शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष) संपर्कात आहेत.

शरद पवार यांनी काही वेळापूर्वी सातारा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, अजित पवारांच्या गटातील नेते तुमच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील का? यावर शरद पवार म्हणाले, माझ्या संपर्कात कोणी नाही. मी त्यात लक्ष घालत नाही. काही नेते जयंत पाटील यांना येऊन भेटतात, याची मला माहिती आहे. याचे परिणाम विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळतील.

दरम्यान, शरद पवार यांना विचारण्यात आलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा नारा दिला होता. मात्र आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत ते १०० पारबद्दलही बोलत नाहीत, हे कशामुळे शक्य झालं? महाविकास आघाडीची महायुतीला धास्ती आहे का? यावर शरद पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या काळात सर्वत्र ४०० पारचा नारा देत होते. ते कुठेही ४०० पेक्षा कमी काही बोलतच नव्हते. ते अनेक गोष्टी सांगत होते. परंतु, देशाच्या पंतप्रधानांनी एखादी भूमिका लोकांसमोर मांडताना ती भूमिका राष्ट्रहिताची आहे का याचं भान ठेवायला हवं.

हे ही वाचा >> विधानसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीचे बच्चू कडूंचे संकेत? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी तुमची…”

शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते ज्या पद्धतीची भाषणं करत होते, त्यामुळे जातीय आणि धार्मिक कट्टरतावादी शक्ती उफाळून आल्या, समाजाचं नुकसान झालं, देशात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. हेच त्यांचं (एनडीए) निवडणुकीचं सूत्र होतं. याच पद्धतीने त्यांना निवडणुका लढायच्या व जिंकायच्या होत्या. मात्र देशातला सामान्य माणूस हा राजकारण्यांपेक्षा अधिक शहाणा झाला आहे. त्यामुळेच त्यांनी संविधान वाचवण्याचा निर्णय घेतला. काही लोक अतिरेकी वृत्तीने निवडणूक काळात लोकांसमोर गेले. लोकांना चुकीच्या मार्गाने नेत होते. मात्र मतदारांनी त्यांचा डाव हाणून पाडला. उद्याच्या निवडणुकीत यासंदर्भात राज्यात जे काही करण्याची गरज असेल ते इथले मतदार नक्कीच करताना दिसतील.

Story img Loader