Sharad Pawar Remark Tadipar on Amit Shah : “सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे”, अशी टीका शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे. अमित शाह यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके’ असा उल्लेख केला होता. शाहांच्या त्या टीकेला शरद पवार यांनी आज चोख प्रत्युत्तर दिलं. “अमित शाह यांना सर्वोच्च न्यायालयाने गुजरातमधून तडीपार केलं होतं आणि आता ते देश चालवतायत”, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. “महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनीच संस्थात्मक स्वरूप दिलं”, अशी टीका शाह यांनी केली होती. त्या टीकेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, अमित शाह हे आता देशाचे गृहमंत्री आहेत. ते मागे एका भाषणात म्हणाले होते, शरद पवार हे भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. परंतु, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला सुप्रीम कोर्टाने तडीपार केलं होतं. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून त्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री झाला आहे आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्ये करत आहे.
हे ही वाचा >> “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं
अमित शाह काय म्हणाले होते?
गेल्या आठवड्यात पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला अमित शाह यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोण असतील तर शरद पवार आहेत अशी टीका केली होती. महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला संस्थात्मक रुप देण्याचे काम हे शरद पवार यांनी केलं, असंही शाह म्हणाले होते. अमित शाह म्हणाले, “शरद पवारांची यांची सत्ता येते तेव्हा मराठा आरक्षण जातं. २०१४ ला भाजपा सत्तेत आली, त्यापाठोपाठ मराठा आरक्षण आलं, २०१९ ला शरद पवार सत्तेत आले, पाठोपाठ मराठा आरक्षण गेलं. त्यामुळे आता काय करायचं ते तुम्ही ठरवा.” या भाषणात अमित शाह यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचा ‘औरंगजेब फॅन क्लब’ असा उल्लेख करत टोला लगावला होता.