संसदेच्या चर्चासत्रातील सहभाग, तिथली उपस्थिती, चर्चासत्रांमध्ये विचारलेले विविध प्रश्न आणि संसदेत मांडलेली खासगी विधेयके याद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे. सुप्रिया सुळे यांना सर्वोत्कृष्ट संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सुप्रिया सुळे यांना यापूर्वी तब्बल सात वेळा हा पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते अशा चर्चा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभर चर्चा होती की, सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा होतील. परंतु शरद पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. तरी पक्षात सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट शरद पवार यांना प्रश्न विचारला. शरद पवार यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी पवारांना असा प्रश्न विचारण्यात आला की, सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे का?
हे ही वाचा >> “मुख्यमंत्री असताना स्वतःच्या मर्जीने काम करू शकले नाहीत, आता…”, ‘त्या’ वक्तव्यावरून सुधीर मुनगंटीवारांचा उद्धव ठाकरेंना टोला
या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, सुप्रिया सुळेंची वेगळी इच्छा आहे. एका वर्षात लोकसभा निवडणूक आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की, लोकसभेची निवडणूक होईपर्यंत मतदारांव्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी घेण्यास त्या इच्छूक नाहीत.