Sharad Pawar Visits Massajog Village in Beed : ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आज बीडमधील मस्साजोग या गावी जाऊन या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट सांत्वनपर भेट घेतली. यावेळी उपस्थितांशी संवादही साधला. त्यानंतर त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “संतोष देशमुख यांच्या हत्येने सर्वसामान्य लोकांना धक्का बसलाय. बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात एक लौकिक आहे. मी अनेक वर्षापासून या ना त्या निमित्ताने या जिल्ह्याची संबंधित आहे. वारकरी संप्रदाय हे या जिल्ह्याचे वैशिष्ट्य आहे. त्या वारकरी संप्रदायाचा विचार घेऊन आपले आयुष्य जगणारे, दुष्काळ काळात त्याला तोंड देणारे, महाराष्ट्राच्या साखर उद्योगाला हातभार लावणारे आणि त्याप्रती कष्ट करणारे कुणी आहेत हा प्रश्न विचारला तर बीडचा उल्लेख हा केला जातो. अशा जिल्ह्यात जे काही घडलं हे कोणालाही न पटणारं, न शोभणारं अतिशय चमत्कारीक कशा प्रकारचं आहे.
शरद पवार म्हणाले, “ज्या तरुण सरपंचाची हत्या झाली. पंधरा वर्ष लोकांचा पाठिंब्याने त्या पदावर बसण्याचं काम ज्यांनी केलं. पंधरा वर्ष ज्याअर्थी निवड झाली त्याचा अर्थ लोकांच्या दैनंदिन सुखदुःखाची समरस होणारा, वादविवादापासून दूर राहणारा असा हा तरुण, कर्तबगार लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या गावांमध्ये काम करतोय. जे काही घडलं त्याच्यात त्यांचा काही संबंध नसताना, कोणी येऊन कोणाला दमदाटी केली. कोणाला मारहाण केली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्यानंतर त्याची चौकशी करण्याची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतोय म्हणून कुणी बाहेरून येतं, व्यक्तिगत हल्ला केला जातो आणि शेवटी तो हल्ला हत्येपर्यंत जातो हे चित्र अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे. याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल”.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
ज्येष्ठ नेते पवार म्हणाले, “लोकसभेचं अधिवेशन काल संपलं. गेले दोन-चार दिवस आम्ही बघतो आहोत, तुमचे (जनतेचे) प्रतिनिधी बजरंग सोनवणे, निलेश लंके असतील आणि जे कोणी खासदार तिथे महाराष्ट्राचे आहेत त्यांनी हा प्रश्न उचलून धरला. गृहमंत्र्यांना भेटले. संसदेत हा प्रश्न मांडून इथे न्याय द्या या प्रकारचा आग्रह बजरंग सोनवणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी देशाच्या लोकसभेमध्ये मांडला. त्यांचे भाषण ऐकत होतो. मी काही त्यांच्या सभागृहाचा सदस्य नाहीये पण ऐकत होतो. सबंध सभागृह, ते जे काही सांगत होते ते ऐकल्यानंतर स्थगित झालं. या देशातील राज्यात काय चाललंय? अशा प्रकारचे प्रश्न नंतर लोक विचारायला लागले”.
हे ही वाचा >> “राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
…तोवर शांत बसायचं नाही : शरद पवार
शरद पवार म्हणाले, “मी स्वतः थोडीबहुत माहिती घेतली. त्याच्यामध्ये सोळंके आणि इतर काही लोक बोलले. एक या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी, शेजारच्या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला. मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासने दिलीत. त्यांनी काही रक्कम दिली. ठीक आहे. कुटुंबाला त्याची मदत होईल. पण तुम्ही कितीही मदत दिली तरी गेलेला माणूस येत नाही. त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही. पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही. त्याच्यावर टिप्पणी करू इच्छित नाही. पण एक गोष्ट करावी लागेल की जोपर्यंत त्याच्या खोलात जाऊन जे कोणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार म्हणून याच्या मागे आहेत त्यांना योग्य प्रकारचा धडा शिकवल्याशिवाय शांत बसायचं नाही. मला आनंद आहे आणि एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळींनी लेखी निवेदन दिलं. जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहेत. तुम्हाला त्यांचीही साथ या ठिकाणी होती. म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकार, लोकप्रतिनिधी, वकील मंडळी आणि या जिल्ह्यातील आजूबाजूचे अनेक लोक तुमचे हितचिंतक म्हणून या प्रश्नाकडे, आणि कुटुंबीयांच्या मागे आहेत”.