मंगळवारी सकाळपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. तसे न केल्यास आपणही राजीनामा देण्याचा निर्धार सगळ्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ आणि वरीष्ठ नेतेमंडळींनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हणाले शरद पवार?

अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण अशा नेतेमंडळींनी शरद पवारांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी या नेतेमंडळींना त्यांची भूमिका सांगितली असून त्यासंदर्भात अजित पवारांनी माध्यम प्रतिनिधींसमोरच वाय. बी. सेंटरबाहेर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना माहिती दिली.

शरद पवारांच्या नावाने घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अजित पवारांनी मारली टपली; म्हणाले, “आरे…!”

“आम्ही काहीजण, विद्या चव्हाण, वंदना चव्हाण, भुजबळ, वळसे पाटील, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, रोहित पवार, चेतन तुपे, प्रफुल्ल पटेल, अशोक पवार, जितेंद्र आव्हाड आम्ही सगळेजण सिल्व्हर ओकला गेलो. आम्ही शरद पवारांना सांगितलं की सगळ्या कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे. त्यांनी मला, रोहितला आणि भुजबळांना सांगितलं, सुप्रियाशीही ते काही गोष्टी फोनवर बोलले”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

शरद पवार निर्णयाचा पुनर्विचार करणार!

“त्यांनी सांगितलं की मी माझा निर्णय सांगितला आहे. पण तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर मला पुन्हा विचार करायला दोन ते तीन दिवस द्या. आपण शरद पवार साहेबांना दैवत मानतो. तेच म्हणाले मला २-३ दिवस द्या. तर आपण सगळ्यांनी त्यांचं ऐकलं पाहिजे. ते म्हणाले मी विचार तेव्हाच करेन जेव्हा सगळे कार्यकर्ते आपापल्या घरी जातील. साहेब म्हणाले मला इथे एकही कार्यकर्ता दिसला नाही पाहिजे. ते म्हणाले की मला कुणी बसलेलं दिसलं तर मी माझा निर्णय बदलणार नाही”, असं अजित पवारांनी उपस्थितांना सांगितलं.

“महाराष्ट्रात उस्मानाबाद, बुलढाणा जिल्ह्याच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला आहे. हे राजीनामासत्र थांबलं पाहिजे असं शरद पवारांनी सांगितलं. माझ्या म्हणण्याला सगळ्यांनी प्रतिसाद दिला पाहिजे. त्यांनी माझं ऐकलंच पाहिजे असा शरद पवारांचा आपल्या सगळ्यांना निरोप आहे”, असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

Video: अजित पवारांनी शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाचं केलं समर्थन; रडणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावत म्हणाले…!

“एकाचाही राजीनामा स्वीकारला जाणार नाही”

“कुणीही मुंबईत येण्याचा प्रयत्न करू नये. जे कुणी राजीनामे देत आहेत, त्यांचा एकाचाही राजीनामा स्वीकार केला जाणार नाही. अजिबात नवीन प्रश्न निर्माण करू नका. उपोषणाला बसणं वगैरे करू नका. हा राष्ट्रवादी परिवाराचा प्रश्न आहे. आपल्या प्रश्नासाठी ज्यांचा पक्षाशी काहीही संबंध नाही, अशा सामान्य नागरिकांना वेठीस धरता कामा नये, या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत”, अशीही माहिती अजित पवारांनी दिली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar says will rethink on resignation decision ajit pawar informs ncp party workers leaders pmw
Show comments