शरद पवार यांनी पुढाकार घेऊन पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करावी, अशी विनंती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी केली आहे. अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकलता दाखवत बिनविरोध निवडणुकीसाठी आवाहन केले होते, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते.
आज दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील डमी उमेदवारी अर्ज भरल्याने चर्चेला उधाण आले होते. मात्र, बावनकुळे यांनी अश्विनी जगताप याच भाजपाच्या अधिकृत उमेदवार असतील, असे स्पष्ट केले. डमी अर्ज भरावा लागतो, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पदयात्रेद्वारे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी भाजपाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अश्विनी जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आहे. अश्विनी जगताप यांच्यासाठी मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर आली आणि पदयात्रेत सहभागी झाली. चिंचवडच्या जनतेला विनंती करतो की, प्रचंड मतांनी अश्विनी जगताप यांना विजयी करावे.
हेही वाचा – पुण्यात खराडीमध्ये बांधकाम प्रकल्पात सुरुंगाचा स्फोट, मजुराचा मृत्यू, एक जखमी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि अजित पवार यांच्याशी बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून संवाद साधला. मी अजूनही विनंती करतो, त्यांना मी भेटायला तयार आहे. चिंचवड पोटनिवडणूक त्यांनी बिनविरोध करावी. असे त्यांनी म्हटले आहे. पुढे ते म्हणाले की, अंधेरीच्या निवडणुकीवेळी शरद पवार यांनी पुढाकार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनामुळे उद्धव ठाकरे यांनी देखील निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन केले होते. त्यानंतर अंधेरीची निवडणूक बिनविरोध झाली होती. शरद पवार यांना विनंती आहे की, जसे अंधेरीच्या निवडणुकीत पुढाकार घेतला, तसाच पुढाकार घेऊन चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध करावी. चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी विनंती महाविकास आघाडीला आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.