राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडून अजित पवार गट स्वतंत्र झाला आणि सरकारमध्ये सहभागी झाला. पक्षाचं नाव आणि चिन्हदेखील संख्याबळाच्या जोरावर अजित पवार गटालाच मिळालं. या फुटीला आता ८ ते ९ महिने उलटले आहेत. मात्र, अजूनही त्या सर्व घडामोडींबाबत राजकीय वर्तुळात चर्चा किंवा दावे पाहायला मिळतात. शरद पवार यांच्या भगिनी सरोज पाटील यांनी यासंदर्भात बोलताना तेव्हा घडलेला एक प्रसंग सांगितला. निर्भय बनो सभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पक्ष फुटला तेव्हा शरद पवारांनी त्यांना फोन करून काय सांगितलं याविषयी भाष्य केलं आहे.
२ जुलै २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार गट सत्तेत सहभागी होणार असल्याचं जाहीर झालं. त्याचदिवशी त्यांच्यासह इतर ९ आमदारांचा मंत्रीपदासाठी शपथविधीही झाला. यानंतर राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी या कृतीचं समर्थन केलं तर काहींनी विरोध केला. यावेळी एकीकडे राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे खुद्द शरद पवारांच्या कुटुंबात त्यावेळी नेमकं काय वातावरण होतं? याबाबत सरोज पाटील यांनी हा प्रसंग सांगितला आहे.
काय म्हणाल्या सरोज पाटील?
“आमच्या कुटुंबात हे जे काही झालं.. त्यांनी माणसं फोडली.. एकेक माणसं जायला लागली. जेव्हा आमचं घर फोडलं, तेव्हा मला अत्यंत वाईट वाटलं. मी दिवसभर रडत होते. माझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. मला वाटलं हे काय झालं. तेव्हा मला शरदचा (शरद पवार) फोन आला. तो म्हणाला, रडतेस काय? हिंमत ठेव. तू शारदाबाईंची लेक आहेस. डोळ्यात पाणी काढायचं नाही. आपल्याला आपल्या आईनं लढायला शिकवलं आहे, रडायला नाही. हिंमत धर. तुझ्या जिवात जीव असेल तेवढं काम कर”, असा प्रसंग सरोज पाटील यांनी सांगताच उपस्थितांकडून त्याला दाद देण्यात आली.
शरद पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर बहीण सरोज पाटील यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…
शरद पवारांच्या राजीनाम्यावेळीही झाल्या होत्या भावुक
दरम्यान, सरोज पाटील शरद पवारांच्या राजीनाम्यावेळीही भावुक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. १ जून रोजी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं एका कार्यक्रमात जाहीर केलं होतं. त्यावेळी अजित पवार वगळता राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर सर्व पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध करत शरद पवारच पक्षाध्यक्षपदी हवेत, असा आग्रह धरला होता. त्यानंतर तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेत असल्याचं जाहीर केलं होतं.