सीबीआयला सध्या वेठीस धरण्याचा प्रयत्न होतो आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्याला रातोरात हकालपट्टी केली जाते आणि स्वत:च्या विचाराच्या व्यक्तीला तिथे पाठवले जाते. यातून सरकारचा कारभार दिसतो. ज्या व्यक्तिचा न्याय व्यवस्थेवर आणि तपास यंत्रणेवर विश्वास नाही, अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता आहे. त्यामुळे देश धोक्यात आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

ते पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संविधान बचाव रॅलीत बोलत आहेत. सत्ताधारी पक्षाकडून संविधानावर हल्ले करण्यात येत आहेत असे शरद पवार म्हणाले. सीबीआयमध्ये जे काही झालं, अधिका-यांच्या ज्या पद्धतीने बदल्या झाल्या, नियुक्त्या झाल्या यातून सरकारने प्रशासनाला हाच इशारा दिला की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. केरळमध्ये अमित शहा गेले आणि म्हणाले की, न्यायालय असा निर्णय कसा देऊ शकतं की ज्याची अंमलबजावणीच होऊ शकतं नाही. यातून न्यायालय, संविधान, स्त्री पुरुष समानता त्यांना मान्य नाही हेच दिसते असे शरद पवार म्हणाले.

दुष्काळाच्या झळा सर्वांनाच बसतायत पण सर्वांत जास्त त्रास महिलांना होतो. पण सरकार निर्णय घेण्यास तयार नाही. आघाडी सरकार असताना दुष्काळात चारा छावण्या सुरु केल्या. मात्र आताच सरकार म्हणते की, आम्ही चारा तयार करु आणि तो घरोघर पोहचवू. लोकांचे प्रश्न न सोडवणाऱ्या सरकारकडून आम्ही लोकशाही मार्गाने सत्ता हिसकावून घेऊ असे शरद पवार म्हणाले.

केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा सरकारला सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा एक निर्णय घेताना दिसत नाही असे शरद पवार म्हणाला.  कार्यक्रम झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं.

पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संविधान बचाव देश बचाव मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार वंदना चव्हाण, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.