सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकावर केलेल्या खर्चाचा लेखाजोखा शनिवारी शरद पवारांनी मांडला. ज्या कंपन्यांकडून हा निधी घेतला तो निधी केंद्र सरकारने सामाजिक कार्यात वापरणं गरजेचं असताना, तो निधी स्मारकाला वापरून काय साध्य केलं असा खडा सवाल पवारांनी उपस्थित केला. ते पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित कामगार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले की, वल्लभ भाई पटेल यांच गुजरात मध्ये स्मारक केलं आनंद आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खस्ता खालल्या आहेत. या लढाऊ नेत्याचं त्या ठिकाणी तुम्ही स्मारक करता त्याला पाठिंबा आहे. साडेतीन हजार कोटी खर्च करून स्मारक उभारलं. सरकारकडे पैसे नाहीत मग पैसे आणले कुठून? असा प्रश्न उपस्थित करून आज यादी प्रसिद्ध झाल्याचे ते म्हणाले.

त्यामध्ये इंडियन ऑइल कंपनी- 900 कोटी, ऑइल अँड नॅशनल गॅस कंपनी कमिशन 500 कोटी, भारत पेट्रोलियम 450 कोटी,हिंदुस्थान पेट्रोलियम-250 कोटी,ऑइल इंडिया-250 कोटी,गॅस ऑथोरिटी ऑफ इंडिया-250 कोटी, पावर ग्रील कंपनी-125 कोटी,मिनरल डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन गुजरात-100 कोटी,इंजिनिअर्स इंडिया-50 कोटी,पेट्रोलेट इंडिया-50 आणि आणखी एक कंपनीचे 6 कोटी या कंपन्यांचा सहभाग असल्याचे ते म्हणाले.

या सर्व कंपन्या केंद्र सरकारच्या असून त्यांच्याकडून अडीच ते तीन हजार कोटी रुपये काढले आहेत. स्मारकाच्या नावाखाली या सरकारी कंपन्यातून हा पैसा काढला आहे आणि पुतळा उभा केला असे पवार म्हणाले.