राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर (२ जुलै) अजित पवार यांनी ५ जुलै रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केला होता. अजित पवार म्हणाले होते, निवृत्त व्हायचं एक वय असतं. सरकारी कर्मचारी ५८ व्या वर्षी निवृत्त होतात. भारतीय जनता पार्टीत निवृत्त व्हायचं वय ७५ च्या पुढचं आहे. अशा परिस्थितीत ८२, ८३ वय झालं तरीही आमचे वरिष्ठ थांबत का नाहीत?
अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा मुद्दा उपस्थित केल्यावर शरद पवारांनीही उत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी ६ जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांना उत्तर दिलं होतं. यावेळी शरद पवार म्हणाले होते, “मी कुठेही थांबण्याचा प्रश्नच येत नाही. मी आता आणखी जोमाने काम करणार आहे. वय ८२ होऊ द्या अथवा ९२ होऊ द्या.” यानंतर सातत्याने शरद पवारांच्या निवृत्तीबाबत चर्चा होत आहेत. त्यावर आज (८ जुलै) पुन्हा एकदा शरद पवार यांनी भाष्य केलं.
शरद पवार यांनी आज नाशिकच्या येवला शहरात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी निवृत्ती आणि वयावरून होणाऱ्या वक्तव्यांचा समाचार घेतला. शरद पवार म्हणाले, “काहीजण (अजित पवार) बोलले तुमचं वय झालं, तुम्ही आता निवृत्त व्हा. खरंतर वय झालंय हे खरं आहे. वय ८२ झालंय हेसुद्धा खरं आहे. पण हा गडी काय आहे हे तुम्ही पाहिलंय कुठं. जास्त सांगायची गरज नाही. उगीच वया-बियाच्या भानगडीत पडू नका. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल.” असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार यांना थेट इशाराच दिला आहे.
हे ही वाचा >> “तुमची असेल-नसेल ती सगळी ताकद लावा अन्…”, पंतप्रधान मोदींना शरद पवारांचं जाहीर आव्हान
नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार ५ जुलैच्या सभेत म्हणाले होते की, एका पिढीनंतर नवी पिढी पुढे येते आहे. तुम्ही आशीर्वाद द्या ना.. चुकलं तर सांगा की अजित तुझं हे चुकलं. चूक मान्य करुन दुरुस्त करुन पुढे जाऊ. पण हे नेमकं कुणासाठी चाललं आहे? आम्ही कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही, आमची चूक आहे का? मित्रांनो आज आपले वरिष्ठ नेते (शरद पवार) यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला गेले होते. यशवंतराव हे आपलं दैवतच आहेत. माझ्याकडूनही चूक झाली होती तेव्हा मी तिथे जाऊन एक दिवस आत्मक्लेश केला होता. मला माझंच वागणं मनाला लागलं होतं. आता जर वय जास्त झालं ८२ झालं, ८३ झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात का? वयाच्या बाबतीत तर आम्हाला वाटतं की तुम्ही शतायुषी व्हावं.