गोविंद पानसरेंवर हल्ला करुन त्यांची हत्या करण्यात आली. या माध्यमातून पुरोगामी विचार नष्ट करण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी केला आहे. ज्यांच्याकडे विचार नाही अशी प्रवृत्ती कायदा हातात घेत आहे. तसंच प्रतिगामी शक्ती वाढत आहेत. देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं अधिवेशन होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त वीस मिनिटं संसदेत आले. सत्तेचा गैरवापर मोठ्या प्रमाणावर केला जातो आहे असं शरद पवारांनी म्हटलं आहे. कोल्हापुरात गोविंद पानसरे यांच्या स्मारकाचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी शरद पवारांनी भाजपावर टीका केली.
प्रतिगामी शक्ती वाढत आहेत
तुमचं मत मांडण्याचा अधिकार तुमचा आहे. कुणी त्या हक्कावर गदा आणत असेल तर चिंता करु नका. काही लोकांवर हल्ले करण्यात आले, कार्यक्रम उधळून लावले गेले. याचा अर्थ स्पष्ट आहे की सत्तेचा गैरवापर करुन आवाज बंद केला जातो आहे. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो? तर झारखंडच्या आदिवासी मुख्यमंत्र्यावर खोटे आरोप केले जातात आणि त्यांना तुरुंगात धाडलं जातं. दिल्लीत काम करणारे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्रास दिला जातो आहे. प्रतिगामी शक्ती विरोधात भूमिका मांडत असल्याने नोटिसा त्यांना रोज पाठवल्या जात आहेत. त्यांचे तीन मंत्री तुरुंगात आहेत. जे काम करत आहेत, भूमिका मांडत आहेत त्यांना तुरुंगात टाकण्याचं काम सुरु आहे.
भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा
दुसऱ्या बाजूने भाजपाच्या बाहेर राहून काम करणारे, केंद्रापेक्षा वेगळी भूमिका घेऊन काम करणारे या सगळ्यांविरोधात ईडी, सीबीआय आणि इतर तपासयंत्रणा यांच्या माध्यमातून दडपण आणलं जातं आहे. जे लोक भ्रष्टाचारात गुंतलेत त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेतली जाते. आज असं बोललं जातं भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा. असं चित्र भाजपाविषयी केलं जातं आहे. ज्यांचे हात कुठेतरी अडकले आहेत अशा लोकांसमोर दहशत निर्माण करुन आपल्याकडे ओढलं जातं ही स्थिती दिसते. आमचा संदेश निवडणुकीपुरता मर्यादित नाही. संघर्ष करण्याची तयारी आपण सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. देशात प्रादेशिक शक्ती त्यासाठी एकवटल्या पाहिजेत असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
आवाज थांबवणे, सत्तेचा गैरवापर करणे टेलिव्हिजनचे चॅनल २-२, ४-४ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश काढणे. याचा अर्थ हाच होतो की, आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्यांना मूलभूत स्वातंत्र्यावर हल्ला करण्यासंदर्भातील यथांकितही चिंता वाटत नाही. याच प्रवृत्ती विरोधात कॉम्रेड पानसरे आयुष्यभर लढले. आज खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली व्यक्त करायची असेल तर, या प्रतिगामी शक्ती आहे त्यांच्या विरोधात संघर्ष करण्याची भूमिका घेतली पाहिजे.