Sharad Pawar on Vote Jihad: व्होट जिहादचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चांगलाच तापला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने या मुद्द्यावर प्रचारात अधिक भर दिला. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समुदायाने महाविकास आघाडीला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, असा आरोप महायुतीचे नेते करतात. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत व्होट जिहादचा आरोप केला जात आहे. आता ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांच्या एका व्हिडीओचा दाखल देऊन देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर टीका केली आहे. याबद्दल शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका केली.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, व्होट जिहादचा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समुदायाने महाविकास आघाडीला मतदान केले. एखाद्या मतदारसंघात विशिष्ट समाजाने एखाद्या पक्षाला मतदान केले तर तो त्यांचा अधिकार आहे. पुण्यामध्ये काही मतदारसंघात एक विशिष्ट समाज भाजपाला मतदान करतो. आम्हाला त्याची सवय झाली आहे. कारण ते नेहमीच तसे मतदान करतात. याचा अर्थ तो काही जिहाद होत नाही. त्यामुळे याला धार्मिक रंग देऊन त्यांची विचारधारा दिसते.
हे वाचा >> ‘लव्ह जिहाद’ ते ‘व्होट जिहाद’, ‘रझाकार’ ते ‘हिंदुत्व’ भाजपाने विधानसभा निवडणुकीत कुठले मुद्दे आणले?
व्होट जिहाद हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी एकप्रकारे या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही याच्या विरोधात आहोत, अशा शब्दात शरद पवार यांनी व्होट जिहादवरून फडणवीस यांना लक्ष्य केले. बटेंगे तो कटेंगे हा विषयदेखील धार्मिक मुद्द्यावरचा आहे. सत्ताधारी जेव्हा हे विषय पुढे करत आहेत. याचा अर्थ आपल्याला यश मिळणार नाही, अशी खात्री त्यांना झाली आहे. त्यामुळेच धार्मिक विषय काढून निवडणूक इतर विषयांवर नेण्याचा प्रयत्न होत आहे.
महायुतीसमोरची एकमेव समस्या म्हणजे व्होट जिहाद – फडणवीस
महायुतीसमोर व्होट जिहाद ही एकच समस्या आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. ते म्हणाले, “एक है तो सेफ है, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला नारा योग्यच आहे. भारत जोडो नावाचा एक समुदाय तयार करण्यात आला. त्यातले लोक भारत जोडोसाठी नाही तर देश तोडण्याचे काम करत आहेत. आपला देश जात, धर्म यात जेव्हा वाटला गेला तेव्हा गुलाम झाला. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे हा देशाचा इतिहास आहे यात आक्षेपार्ह काहीही नाही.”