राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रमुख शरद पवार हे सध्या लोणावळा दौऱ्यावर आहेत. शरद पवार गटाने लोणावळ्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं असून स्वतः शरद पवार यांनी आज मावळमधील त्यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. लोणावळ्यात पोहोचल्यावर कार्यकर्त्यांनी तुतारी फुंकून शरद पवार यांचं जंगी स्वागत केलं. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने शरद पवारांना हार घालण्यात आला. तसेच जेसीबीद्वारे त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली. दरम्यान, अजित पवार गटातील लोणावळ्यातील १०० हून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, देशात भाजपाकडून सत्तेचा गैरवापर होत आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात डांबलं आहे. आता ते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मागे लागले आहेत. केजरीवाल गेल्या १० वर्षांपासून दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आता क्राईम ब्रँचने आठवं समन्स धाडलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक करण्याची भाजपाची योजना आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकल्यानंतर भाजपाची आता दिल्लीवर नजर आहे. महाराष्ट्रातही तशीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनिल देशमुखांना सहा महिने तुरुंगात डांबून ठेवलं होतं. तर ‘सामना’चे (शिवसेनेचं मुखपत्र) संपादक आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही चार महिने तुरुंगात अडकवलं होतं. कारण राऊत हे सामनातून भाजपावर टीका करतात. म्हणजे या देशात बोलण्याचं आणि लिहिण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप केले. त्यानंतर त्यांना सहा महिने तुरुंगात डांबण्यात आलं. शेवटी न्यायालयाने त्यांना मुक्त केलं. त्यावेळी सांगण्यात आलं की, देशमुख यांनी एक कोटी रुपयांची देणगी स्वीकारली होती. एका महाविद्यालयाची इमारत बांधण्यासाठी धनादेशाच्या माध्यमातून ती देणगी घेतली होती. अशाच पद्धतीने त्यांनी संजय राऊतांना तुरुंगात टाकलं होतं. आपल्या देशात पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून अनेक पंतप्रधान आणि मोठे नेते झाले. परंतु, एखाद्या लेखकाने किंवा संपादकाने टीका केली म्हणून त्याला कोणी तुरुंगात टाकलं नाही.

हे ही वाचा >> “केसाने गळा कापू नका”, शिंदे गटाचा भाजपाला इशारा; म्हणाले, “आमचा विश्वासघात…”

शरद पवार म्हणाले, मी इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं की, इथल्या काही लोकांनी आणि स्थानिक आमदाराने (मावळचे आमदार सुनील शेळके) आजच्या बैठकीला तुम्ही येताय म्हणून तुम्हाला दमदाटी केली. कोणीतरी त्यांच्यावर टीका केली म्हणून त्यांनी त्या टीकाकारांनाही फोन करून दम दिला. हा काय प्रकार आहे? कोणी चूक केली तर त्यांच्यावर टीका करायची नाही का? लोकशाहीत जाहीर बोलायचं नाही का? कोणी बोललं तर दमदाटी होते. इथले जे आमदार दमदाटी करत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला इथे कोण आलेलं आठवतंय का? तेव्हा पक्षाचा अध्यक्ष कोण होता? निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी पक्षाचं चिन्ह लागतं, पक्षाचा फॉर्म लागतो, तो फॉर्म आणि चिन्ह तुला कोणी दिलं? तुझ्या अर्जावर कोणाची सही होती? तू माझ्या सहीने तुझा अर्ज भरला होतास. तुम्ही लोक आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? तुला निवडून आणण्यासाठी जे कार्यकर्ते राबले, ज्यांनी तुझ्यासाठी घाम गाळला, त्यांनाच तू दमदाटी करतोस. माझी त्या आमदाराला विनंती आहे. एकदा दमदाटी केलीस, पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. परंतु, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी त्याला सोडतही नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar slams mla sunil shelke at lonavala ncp meeting over bothering party workers asc
Show comments