नगर : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली असली, तरी देशातील जनतेची त्यांना सहमती मिळाली आहे का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारचा उल्लेख ‘लंगडे सरकार’ असा करत लोकशाहीतील मतदारांच्या ताकतीमुळे आता ‘मोदी सरकार’ही राहिले नाही आणि ‘मोदी गॅरंटी’ही राहिली नाही, अशी घणाघाती टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये पक्षाच्या वतीने सोमवारी विजयोत्सवी सभेचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या नवनिर्वाचित आठ खासदारांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, तसेच पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले, की मोदी यांनी प्रचारात तारतम्य ठेवले नाही, मर्यादा पाळल्या नाहीत. अल्पसंख्याकांबद्दल द्वेष व्यक्त केला. माझा ‘भटकता आत्मा’ असा उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला ‘नकली शिवसेना’ म्हणाले. सत्ता मिळण्याची शक्यता नसते तेव्हा अशी बेफाम वक्तव्ये केली जातात असा टोला पवार यांनी लगावला. राम मंदिर उभारले याचा आनंदच आहे. मी तेथे गेलो तर मंदिरात जाईनही. परंतु मोदींनी चुकीचा वापर केल्याने अयोध्येतील जनतेने मोदींचा पराभव केला, असे पवार म्हणाले. या वेळी शेकापचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, शशिकांत शिंदे, प्राजक्त तनपुरे, उत्तम जानकर आदींचे भाषण झाले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी स्वागत केले.

महाराष्ट्राचे अष्टप्रधान

पक्षाचे आठही खासदार हे महाराष्ट्राचे ‘अष्टप्रधान’ असल्याचा उल्लेख करत पवार यांनी हे खासदार महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची जपणूक करतील अशी ग्वाही दिली. महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत जागरूकतेने मांडतील. संसदीय कामकाजाचा आपला ५६ वर्षांचा अनुभव, ज्ञान याचा फायदा आपण त्यांना देऊ, असेही ते म्हणाले. पराभूत उमेदवार शशिकांत शिंदे, श्रीराम पाटील यांनीही चांगली लढत दिल्यामुळे त्यांचाही गौरव करण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar slams modi government on ncp s anniversary day zws