Sharad Pawar on Narendra Modi And Politics : “शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो” असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी केलं होतं. मोदींच्या या वक्तव्याची फिरकी घेत शरद पवार म्हणाले, “मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे, मी ते कोणाच्याही हाती देत नाही.” मोदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अनेक नेते शरद पवारांना राजकारणातील गुरू मानतात. त्यांचं राजकारणात येण्याचं व यशाचं श्रेय ते शरद पवारांना देतात. मात्र शरद पवारांनी पूर्वी त्यांच्याबरोबर असलेल्या आणि आता विरोधात बसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही चिमटा काढला आहे. शरद पवारांचा रोख मोदींसह उपमुख्यमंत्री अजित पवारांकडेही असावा असं बोललं जात आहे.
शरद पवार म्हणाले, “पंतप्रधानांनी मागे म्हटलं होतं की मी शरद पवारांचं बोट धरून राजकारणात आलो, त्यांचं ते वक्तव्य मी अजिबात मान्य करत नाही. नरेंद्र मोदी एका भाषणात म्हणाले होते की शरद पवार यांचं बोट धरून मी राजकारणात आलो आणि इथवर पोहोचलो. मोदी तसं बोलल्यापासून मी कोणालाही माझं बोट धरायला देत नाही. मला माझ्या बोटावर पूर्ण विश्वास आहे. मी माझं बोट कोणाच्याही हातात देणार नाही.”
अमित शाहांना चोख प्रत्युत्तर
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. अमित शाह यांनी शरद पवार यांचा ‘भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके’ असा उल्लेख केला होता. यावर शरद पवार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे.”
हे ही वाचा >> “मंत्रीजी खिशात हात टाकून पुन्हा सभागृहात येऊ नका”, लोकसभा अध्यक्षांचा संताप; महाराष्ट्राच्या खासदारालाही सुनावलं
“महाराष्ट्रातील भ्रष्टाचाराला शरद पवारांनीच संस्थात्मक स्वरूप दिलं. ते भ्रष्टाचारी लोकांचे म्होरके आहेत, असं अमित शाह म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी आज (२६ जुलै) प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले, “मागे एकदा अमित शाह म्हणाले की शरद पवार भ्रष्टाचारी लोकांचे सुभेदार आहेत. परंतु, देशाच्या गृहमंत्रिपदावर बसलेल्या या माणसाला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या राज्यातून तडीपार केलं होतं. अमित शाह हे जेव्हा गुजरातमध्ये मंत्री होते. तेव्हा त्यांनी कायद्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखली जावी म्हणून गुजरातमधून तडीपार केलं होतं. तो माणूस आता देशाचा गृहमंत्री बनला आहे आणि देशाचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेऊन अशी वक्तव्ये करत आहे.”