Sharad Pawar on CM Candidate: शरद पवार सध्या सांगली दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान ते अनेक स्थानिक राजकीय नेते, आजी-माजी आमदारांच्या भेटीगाठी घेत असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये काही राष्ट्रवादी काँग्रेसचेच माजी सहकारी असल्याचंही समोर आलं आहे. याशिवाय शरद पवार महाराष्ट्राच्या इतरही काही भागांचे दौर करून तिथे नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग चालू असल्याचं बोललं जात असताना त्यावर शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाष्य केलं.
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात येणार?
यावेळी पत्रकारांनी हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात येणार असल्याबाबत विचारणा केली. त्यावेळी शरद पवारांनी सूचक विधान केलं. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचा राजीनामा दिलाय असं माध्यम प्रतिनिधींनी विचारताच शरद पवार म्हणाले, “हर्षवर्धन पाटील यांनी कधी राजीनामा दिलाय? आज काय ठरतंय ते बघू. आज दुपारी २ वाजेपर्यंत काय होतंय ते बघा. नंतर बोलू”, असं म्हणत शरद पवारांनी पाटील पक्षप्रवेश करणार असल्याचेच सूतोवाच केल्याचं सांगितलं जात आहे.
राजेंद्र देशमुखांच्या घोषणेवर शरद पवारांना आश्चर्य!
दरम्यान, यावेळी राजेंद्र देशमुख भाजपातून शरद पवार गटात येण्याच्या तयारीत असल्याबाबत व त्यांनी थेट माध्यमांशी बोलताना तशी घोषणाच केल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर आश्चर्य व्यक्त केलं. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर लगेचच राजेंद्र देशमुख यांनी ही घोषणा केली. त्यावर शरद पवार म्हणाले, “त्यांनी असं सांगितलं?” यानंतर पत्रकारांनी पवारांना थेट राजेंद्र देशमुख यांचा व्हिडीओच दाखवल्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “हे सगळे जुने सहकारी भलतीकडे गेले असतील. त्यांच्या लक्षात आलं की हा रस्ता काही खरा नाही. आपल्या योग्य रस्त्याने गेलं पाहिजे. म्हणून येतात. स्वागत आहे. आमचं म्हणणं आहे की एकत्र येऊन लोकांचं काम करू. महाराष्ट्राला मोठं करू”, असं ते म्हणाले.
पत्रकारानं ‘तो’ प्रश्न केला आणि पवारांनी चमकून पाहिलं!
दरम्यान, या चर्चेदरम्यान एका पत्रकाराने मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीबाबत पवारांना प्रश्न केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होत असून तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठीही इच्छुक आहात असं सांगितलं जात आहे’ असा प्रश्न करताच शरद पवारांनी चमकून पत्रकाराकडे पाहात विचारलं “मी?” यावर प्रश्न अधिक स्पष्ट करत ‘तुम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पदासाठी इच्छुक आहे का’ असा प्रश्न केला गेला. त्यावर शरद पवारांनी मिश्किल हास्य करत उत्तर दिलं.
“आमच्या पक्षात आम्ही याची चर्चा केली. एक म्हण आहे. मी हे जातीय बोलतोय असं समजू नका. बाजारात तुरी, भट भटणीला मारी. कशाचा काही पत्ता नाही, आजच त्याची चर्चा. अजून निवडणुका व्हायच्या आहेत. सरकार बनवायचं तर त्यासाठी बहुमत पाहिजे. बहुमत मिळालं तर नेता निवडतील. नेता निवडला तर मुख्यमंत्री होईल. जयंत पाटील कधी असं बोलतात का? त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे”, असं शरद पवार म्हणाले. मात्र, यावेळी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी पक्ष इच्छुक नाही, असंही स्पष्टपणे न सांगितल्यामुळे यावरून तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे.