लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह पहिल्या मंत्रिमंडळाचा शपथविधीही पार पडला आहे. आता एनडीएमधील इतर मित्रपक्षांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले आहेत. या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपासाठी धक्कादायक निकाल लागले. एकट्या भाजपाच्या जागा २३ वरून थेट ९ पर्यंत खाली आल्या. महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या. त्यात सर्वाधिक चर्चेत असणारी निवडणूक म्हणजे बारामती. याच निवडणुकीची थेट रशियातही चर्चा होती, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.
शरद पवार बारामती दौऱ्यावर असून यादरम्यान त्यांनी सांगवीतील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी काय चर्चा झाली, यासंदर्भात शरद पवारांनी त्यांच्या एक्स हँडलवर सविस्तर पोस्ट टाकली आहे. या संवादादरम्यान केलेल्या विधानांचा या पोस्टमध्ये उल्लेख आहे.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवारांनी सांगवीचं नेतृत्व नव्या पिढीकडे गेल्याचं यावेळी सांगितलं. “एक काळ असा होता की, सांगवीला माझं जाणं येणं नेहमी असायचं. अनेक सहकारी होते. त्यातले काही हयात आहेत व काही नाहीत. सांगवीचे नेतृत्व आता नव्या पिढीच्या हातात आहे. अनेक निवडणुकींमध्ये सांगवीच्या नागरिकांनी सतत आम्हा लोकांना पाठिंबा दिला”, असं शरद पवार म्हणाले.
“आपण सुडाचं राजकारण करत नाही”
यावेळी शरद पवार यांनी सूचक राजकीय विधान केलं असून त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. “मी बऱ्याच दिवसांनी या वेळेला तालुक्यातल्या गावांमध्ये जातोय. गावाले लोक सांगतात की निवडणुकीत काही लोकांकडून खूप विरोध झाला. पण जे झालं ते विसरून जायचं. लक्षात ठेवायचं नाही. सुडाचं राजकारण आपण कधी करत नाही. पण एक गोष्ट बारामतीत सिद्ध झाली. गावातल्या नेत्यांची दुकानं चालली नाहीत. पण सामान्य माणसं, साधी माणसं, लहान शेतकरी, कष्टकरी, कामगार यांचं दुकान जोरात चाललं. यातून नवीन पिढी, तरुणांची पिढी पुढे आली”, असं शरद पवार म्हणाले.
“या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. आज माझ्याबरोबर रशियावरून पीटर नावाचा एक मुलगा आलाय. मी त्याला विचारलं कशासाठी येतोय? तो म्हणाला गावामध्ये तुमच्या निवडणुका झाल्या त्याची काय पद्धत असते? हे पाहायला आलोय. रशियात सुद्धा बारामती निवडणुकीची चर्चा झाली. म्हणून तो रशियावरून स्वतः इथे आला आहे. काही हरकत नाही. जी चर्चा सगळीकडे झाली, तो इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला”, असंही शरद पवार म्हणाले.