लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रचाराची धामधूम सुरू झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावला आहे. यंदाच्या निवडणुकीत अनेक दिग्गज महिला नेत्याही रिंगणात असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागत असल्याबाबत शरद पवार यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी यावर सविस्तर उत्तर दिलं. पुण्यात बालगंधर्व येथे ते उपस्थित तरुणांशी बोलत होते.
शरद पवार यांनी त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवर यासंदर्भात सविस्तर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांना विचारण्यात आलेला प्रश्न आणि त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर असा मजकूर आहे. “राजकारणात महिलांना त्यांच्या पतीच्या तालावर नाचावं लागतं, त्यासाठी काय करता येईल?” असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर कर्तृत्व हे फक्त पुरुषांमध्येच असतं असं नव्हे, असं शरद पवार म्हणाले.
“नव्या पिढीने मानसिकता बदलायला हवी”
“मला असं वाटतं कर्तृत्व हे फक्त पुरुषांतच असतं असं नव्हे. कर्तृत्व दाखवायची संधी जर दिली तर मुलीसुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व दाखवू शकतात. समाजामध्ये जरी मुलींना प्रोत्साहित करण्याबद्दलचा विचार यशस्वी झाला नसला तरी नव्या पिढीने ही मानसिकता बदलली पाहिजे, बदलायचा आग्रह धरला पाहिजे आणि मुलींनासुद्धा संधी मिळाली पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.
अमेरिका व मलेशियात महिला अधिकाऱ्यांची परेड
“मी एक उदाहरण सांगतो.. मी देशाचा संरक्षण मंत्री असताना एका मला अमेरिकेत जावं लागलं. अमेरिकेला गेल्यानंतर एक पद्धत अशी आहे कि दुसऱ्या देशात संरक्षण मंत्री गेला असताना त्याचं विमान उतरलं की त्याच्यासाठी एक स्वागत कार्यक्रम केला जातो. त्याच्यासमोर एक परेड असते. अमेरिकेत आणि मलेशिया या दोन देशांत मला महिला अधिकाऱ्यांनी सलाम दिला. तिथून परत आल्यावर मी आमच्या आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या तिन्ही दलांच्या प्रमुखांची बैठक बोलावून त्यात हा मुद्दा मांडला”, असं शरद पवारांनी नमूद केलं.
तो प्रसंग सांगताना शरद पवार पुढे म्हणाले, “त्यांना मी सांगितलं की जगभरात मुली लष्करात आहेत, पण आपल्या देशामध्ये का नाही? तिघांनी सांगितलं कि मुलींना झेपणार नाही. त्यानंतर झालेल्या आणखी दोन बैठकांमध्येही त्यांचं उत्तर तेच होतं. बैठक संपताना मी त्यांना मंत्री माझा निर्णय सांगितला. मी त्यांना म्हणालो की इथून पुढे आर्मी, नेव्ही, एअर फोर्समध्ये १० टक्के तरी मुली असतील आणि ते प्रमाण हळूहळू वाढवायचं. आज १५ ऑगस्टच्या परेडचं नेतृत्व मुली करतात. एवढंच नव्हे या देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठीची लढाऊ विमानं चालवायचं कामसुद्धा मुली करतात. याचा अर्थ कर्तृत्व आहे, संधी दिली पाहिजे आणि मानसिकता बदलली पाहिजे”, असं शरद पवार म्हणाले.