Sharad Pawar : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण तापलं आहे. विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागितली. मात्र, तरीही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असून आज महाविकास आघाडीच्यावतीने मुंबईमध्ये सरकारच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे.

या आंदोलनामध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महायुतीवर हल्लाबोल केला. “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळल्याचं धक्कादायक विधान केलं”, अशी टीका शरद पवारांनी केली.

हेही वाचा : “मोदी माफी मागत असताना व्यासपीठावर…”, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका!

शरद पवार काय म्हणाले?

“मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. सध्याच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला अशा प्रकारचं धक्कादायक विधान केलं. आज आपण या ठिकाणी गेट वे ऑफ इंडियाच्या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गेल्या ५० वर्षांपासून लोकांना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये असे अनेक पुतळे आहेत. पण मालवणमध्ये उभारलेला पुतळा भ्रष्ट्राचाराचा नमुना होत आहे. राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याच्या उभारणीमध्ये भ्रष्ट्राचार झाला हा जनमाणसांमध्ये समज निर्माण झाला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे. तसेच संपूर्ण शिवप्रेमींचाही अपमान आहे. त्यामुळे हा अपमान करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं”, असं शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“देशाचे पंतप्रधान महाराष्ट्रात आले आणि माफी मागितली. पण माफी मागतानासुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर मग्रुरी होती. मग्रुरीने माफी आम्हाला मान्य नाही. व्यासपीठावर एक शाहाणा, दोन दीड शहाणे म्हणजे एक फुल – दोन हाफ बसले होते. त्यातील एक हाफ हसत होता. महाराजांची तुम्ही एवढी थट्टा करता. तुम्हाला काय वाटतं? मोदींनी माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली? पुतळा बसवताना भ्रष्टाचारा झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचाऱ्यांवर पांघरून घालण्याकरता मागितली? निवडणुकीसाठी तुम्ही सिंधुदुर्गात आला होता. आम्हाला अभिमान वाटला होता की नौदल दिन माझ्या महाराष्ट्रातील किनारपट्टीवर साजरा होत आहे. हा कार्यक्रम दिमाखदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईने भ्रष्ट्राचार करून पुतळा बसवण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते की मोदी गॅरंटी. हीच ती मोदी गॅरंटी, हात लावीन तिथे माती होईल”, असं म्हणत त्यांनी टीकाही केली.