राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पक्षचिन्ह ‘घड्याळ’वर दावा सांगितला आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘घड्याळ’ पक्षचिन्हाबाबत मोठं विधान केलं आहे. पक्षचिन्ह कुठेही जाणार नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. ते वाय बी सेंटर सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
यावेळी शरद पवार म्हणाले, “काल नाशिकला पक्षाच्या कार्यालयात काहीतरी गडबड केली गेली. काही लोकांनी कार्यालयाचा ताबा घेतला. ते कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आहे. तुम्ही (अजित पवार गट) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहात का? तुम्ही सांगता आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. पण उद्या कुणीही उठेल आणि मीच काँग्रेस आहे, मीच शिवसेना आहे, मीच भाजपा आहे, असं सांगायला लागलं, तर याला काही अर्थ आहे का? त्यामुळे अशाप्रकारे भूमिका मांडून कार्यालयाचा ताबा घेणं, ही बाब लोकशाहीमध्ये योग्य नाही.”
“जेव्हा मी काँग्रेसमध्ये होतो. तेव्हा टिळक भवन आमच्याकडे होतं. त्यानंतर जेव्हा आम्ही नवीन पक्ष काढायचा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही टिळक भवन सोडून दिलं. कारण ती मालमत्ता काँग्रेस पक्षाची होती. ती मालमत्ता हिसकावून घ्यायची आम्हाला आवश्यकताही नव्हती. कारण ती मालमत्ता आमच्याच हातात होती,” असं उदाहरण यावेळी शरद पवारांनी दिलं.
हेही वाचा- “शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याची…”, रोहित पवारांचं विधान
शरद पवार पुढे म्हणाले, “आता हा पक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आमचा आहे, असं काही लोक सांगत आहेत. ती घड्याळाची खूण आमची आहे, असंही ते म्हणतायत. ठीक आहे, तुम्ही तसं म्हणू शकता. पण निवडणूक आयोगानं घड्याळाची खूण कुणाला दिली, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. तुमच्यासाठी सांगतो, ती खूण (घड्याळ) कुठेही जाणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे की एखादी खूण (पक्षचिन्ह) देशाचं राजकारण ठरवत नाही.”
हेही वाचा- “श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी….”, सुप्रिया सुळेंची वडिलांसाठी ‘खास’ कविता
स्वत:च्या राजकीय निवडणुकींच्या इतिहासाबद्दल माहिती देताना शरद पवार म्हणाले, “मी माझ्या व्यक्तिगत जीवनात अनेक निवडणुका लढलो. १९६७ साली पहिली निवडणूक लढलो. त्यावेळी माझं चिन्ह ‘बैलजोडी’ होती. एकेकाळी काँग्रेसची खूण ‘बैलजोडी’ होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट पडले. त्यामुळे काँग्रेसचं ‘बैलजोडी’ हे चिन्ह गेलं. त्यानंतर ‘गाय-वासरू’ चिन्ह मिळालं. नंतरच्या काळात ‘चरखा’ आणि ‘हात’ (पंजा) ही चिन्हं मिळाली. सर्वात शेवटी मला ‘घड्याळ’ चिन्ह मिळालं.”
हेही वाचा- शरद पवारांकडे संख्याबळ किती? बैठकीला कोणते आमदार-खासदार उपस्थित? पाहा संपूर्ण यादी
“मी घड्याळ, हात, चरखा, गाय-वासरू अशा सर्वच चिन्हांवर निवडणूक लढलो. पण कुठेच कमी पडलो नाही. त्यामुळे कुणी सांगत असेल की, आम्ही चिन्ह घेऊन जाऊ… तर चिन्ह जाणार नाही. ते जाऊही देणार नाही. जोपर्यंत सामान्य माणसांच्या अंतकरण:त त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोल आहे, तोपर्यंत काहीही चिंता करायचं कारण नाही. एवढंच मी सांगू इच्छितो,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.