Sharad Pawar: शरद पवार हे त्यांच्या राजकारणातल्या टायमिंगसाठी प्रसिद्ध आहेत. शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. तसंच या पत्रकर परिषदेत शरद पवारांनी कोल्हापूरच्या पांढऱ्या तांबड्या रश्श्याचंही कौतुक केलं. एवढंच नाही कोल्हापूरच्या रांगड्या भाषेचंही कौतुक शरद पवारांनी केलं आणि एक भन्नाट किस्सा सांगितला जो ऐकून सगळेच हसून लोटपोट झाले. तसंच महाराष्ट्रात लोकांचं सरकार येणार असंही शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले.

महाराष्ट्रात लोकांचं सरकार येणार -शरद पवार

लोकांनी आता भाजप आणि त्यांच्याबरोबर असलेल्या पक्षांकडून सत्ता काढून घ्यायची निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमधील कोणत्या पक्षाने किती जागा लढवायच्या याचा निर्णय झालेला नाही. ७ सप्टेंबरला महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितल. आम्ही तिन्ही पक्ष एकसंध आहोत. विधानसभा निवडणूक दीड महिन्यावर आली आहे. ज्या जागा आपल्याला मिळतील त्याठिकाणी उत्तम उमेदवार देऊ, असंही शरद पवार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्य हे लोकांचेच येणार आहे, देशाला योग्य दिशा देण्याचं काम एकत्रित केलं जाईल याचं आश्वासन देतो, असंही शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी सांगितलं.

हे पण वाचा- Sharad Pawar : मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आणि नेमका ठरणार कसा? शरद पवारांनी उत्तर दिलं म्हणाले, “आम्ही..”

कोल्हापूर हे माझं आवडतं शहर

“कोल्हापूर हे महाराष्ट्रातलं माझं आवडतं शहर आहे असं शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रातली अशी काही गावं आहेत जिथे राहायला मला खूप आवडतं. त्यापैकी एक म्हणजे कोल्हापूर. इथली हवा चांगली आहे. कोल्हापूर हे माझं आवडतं शहर आहे. तांबडा आणि पांढरा रस्सा या ठिकाणी खूप चांगला मिळतो. मी एके ठिकाणी सोमवारी (२ सप्टेंबर) चाललो होतो. आम्ही चाललो होतो त्यावेळी पोलिसांनी तिन्ही बाजूचे रस्ते अडवले होते. मी कारमध्ये बसलेल्या सहकाऱ्याला म्हटलं की हे काही चांगलं नाही, रस्ते अडवायला नको. त्यावर ते मला म्हणाले की वाहतूक सुरळीत करण्यासाठी असं करतात. लोकांनाही त्याचं कौतुक वाटतं.”

कोण सुक्काळीचा चाललाय तो…

“मी त्यांना म्हणालो, लोकांना याचे कौतुक वाटते की नाही हे मला माहिती नाही. पण आजपर्यंत लहानपणापासून मी कोल्हापुरात येतो तेव्हा मी ऐकत आलोय म्हणा किंवा शिकलोय म्हणा, ज्यांच्या गाड्या थांबवल्यात ते समोरच्याला उद्देशून म्हणतात कोण चाललाय सुक्काळीचा तो….! शरद पवारांनी ( Sharad Pawar ) हा किस्सा सांगितला आणि त्यांनाही हसू आवरलं नाही उपस्थितही हसून हसून दमले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद थांबवली. पण या भन्नाट किश्शामुळे ती स्मरणात राहिली.