राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला एक विशेष मुलाखत दिलीय. त्या मुलाखतीत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर दिलखुलास मतंही व्यक्त केलीत. धारावीच्या पुनर्विकासावर तुमचे मत काय, असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता शरद पवारांनीही त्याला उत्तर दिलंय. धारावी असो, मोतीलाल नगर असो, तिथल्या पुनर्विकासाने तिथल्या लोकांना चांगली घरं मिळतील, मुंबईचा चेहरा जो वेगळा दिसतो, तो सुधारेल, असं शरद पवार म्हणालेत. शरद पवार शुक्रवारी (७ एप्रिल) एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
”धारावीत अनेक लघुउद्योग आहेत, तिथले लोक वेगळे आहेत. विविध प्रकारचे व्यवसाय करतात, उद्योगधंदे चालवतात, अशा लोकांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळणं आवश्यक आहे, त्यामुळे त्यांची उत्पादकता वाढेल. तसेच या भागासाठीही ती फायद्याची बाब आहे. मुंबईत आल्यानंतर विमानातून उतरल्यावर धारावीच्या झोपडपट्ट्या दिसतात हा गैरसमज लवकरच दूर होईल. धारावीचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून तिथे सुरू आहे. त्यामुळे मला वाटते ती चांगली गोष्ट आहे”, असंही शरद पवारांनी अधोरेखित केलं आहे.
हेही वाचा : “भाजपा गौतम अदाणींना का वाचवत आहे?”, राहुल गांधींनी सांगितलं कारण, म्हणाले…
चर्चेची ही प्रक्रिया आजकाल होतच नाही, शरद पवारांचं मत
संसदेतील कामकाज आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवर शरद पवार म्हणाले, मला संसदेत येऊन जवळपास ५६ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. संसद आणि विधानसभेत मी अनेक गोष्टी सातत्याने केल्यात, बऱ्याचदा गोंधळ पाहिला आहे. पण हा प्रकार घडल्यानंतर संध्याकाळी चर्चा सुरू व्हायची, दुसऱ्या दिवशी सकाळी संसदीय कामकाज मंत्र्यांची जबाबदारी असते की, सभागृहात कोंडी फोडून त्यावर चर्चा घडवून आणायची, दुसऱ्या दिवशी बसून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न व्हायचा. पण आता तसं काही दिसत नाही. चर्चेची ही प्रक्रिया आजकाल होतच नाही, असंही पवार म्हणालेत.
…म्हणून संसदेचं अधिवेशन वाया गेलं
मला आठवते गुलाम नबी आझाद संसदीय कामकाज मंत्री होते, तेव्हा विरोधी पक्ष खूप मजबूत होता. अनेक मुद्द्यांवर विरोधकांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही, मात्र गुलाम नबी आझाद हे विरोधी पक्षनेत्यासोबत बसून काही तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करायचे आणि सभागृहाचे कामकाज चालूच असायचे. आजकाल जसा टोकाचा संघर्ष करणं योग्य नाही, तसंच चर्चेची प्रक्रिया थांबवणंही योग्य नाही, या दोन्ही गोष्टी घडल्यामुळे संपूर्ण अधिवेशन वाया गेलं, असंही शरद पवार म्हणाले.
हेही वाचा : “पंतप्रधान आणि अदानी यांचे नाते काय?”, डॉ. नितीन राऊत आक्रमक, म्हणाले “ते २० हजार कोटी रुपये कुठून आले?”