लोकसत्ता वार्ताहर

वाई: राज्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना चारा उपलब्धता, माणसाच्या हाताला काम आणि पाण्याची उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र ऐन लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीमध्ये राज्यातील दुष्काळाकडे सरकारचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरून आम्हाला संघर्षांची भूमिका घ्यावी लागेल असा थेट  इशारा शरद पवार यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना दिला.

 पवार म्हणाले, की राज्यामध्ये पावसाच्या अनुशेषामुळे दुष्काळाची परिस्थिती आहे.  राज्यातील दुष्काळाच्या संदर्भात कोणतेही ठोस निर्णय लोकसभेच्या रणधुमाळीमुळे होताना दिसत नाहीत.

हेही वाचा >>>अकोला : प्रशिक्षण केंद्रातील ६० महिला पोलिसांची प्रकृती बिघडली, दूषित पाण्यासह उन्हाचा फटका

‘तुरुंगाऐवजी भाजप बरा’

 शिवसेनेने आपल्या जागा परस्पर जाहीर केल्यामुळे आघाडीमध्ये नाराजी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र असे कुठलेही मतभेद महाविकास आघाडीमध्ये नसल्याचे पवार म्हणाले.  प्रफुल्ल पटेल हे आमच्या समवेत होते, तेव्हा आम्ही चिंतेत होतो. सध्या नवीनच वारे सुटले आहे. ‘तुरुंगात जाण्याऐवजी भाजपमध्ये गेलेले बरे..’ असा त्याचा अर्थ आहे असे प्रफुल पटेल यांना सीबीआयने निर्दोष ठरवल्याच्या मुद्दय़ावर पवार यांनी टोला लगावला.

देशाची प्रतिष्ठा धुळीला

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत पवार म्हणाले, की याची आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका व जर्मनी या देशांनीसुद्धा दखल घेऊन टीका केली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा धुळीला मिळत आहे.

Story img Loader