नवी दिल्ली : ‘मराठी संमेलनाशी राजकारण्यांचा संबंध काय, अशी चर्चा सातत्याने केली जाते. पण, या वादाला काहीही अर्थ नाही. राजकारण व साहित्य दोन्हीही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला पाहिजे, असे स्पष्ट मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन समारंभात व्यक्त केले.

राजकारण आणि साहित्य यांच्यातील परस्पर प्रवाह दुतर्फा असतो. लोकमान्य टिळक, पं. नेहरू, अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण या राजकारण्यांनी साहित्याला प्रतिष्ठा दिली. ही उदाहरणे पाहिली तर साहित्याला राजाश्रय लाभलेला नाही तर, राजाने साहित्य कला जोपासली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या लेखणीला देखील तलवारीसारखी धार होती. राजकारण आणि साहित्याची फारकत होऊ शकत नाही. हे दोघे परस्परांना पूरक ठरतात, असे पवार म्हणाले.

मराठी सारस्वतांची दिंडी दिल्लीला आली त्याचा मनापासून आनंद होत आहे. मराठी माणसाने अटकेपार झंडा रोवला होता. मराठी माणूस दिल्ली, हरियाणा, इंदौर, ग्वाल्हेर अशा देशाच्या कानाकोपऱ्यात दिसतो. भीमथडीच्या तट्टांनी जसे यमुनेचे पाणी टाकले त्याप्रमाणे मराठी साहित्याचा अमृतानुभव घेण्यासाठी आपण पुन्हा यमुनेच्या तिरी जमलो आहोत, असे पवार या वेळी म्हणाले.

असहिष्णुता फारशी योग्य नाही

साहित्यिक आमच्या क्षेत्रात आले तर स्वागतच आहे. जनमानसात परिवर्तन घडवण्यासाठी लेखणी झिजवली तर मनापासून समाधान वाटेल. आम्ही चुकीच्या रस्त्याने जात असलो तर परखडपणे लिहिण्याची भूमिका घेतली तर त्याचेही स्वागत आमच्या क्षेत्रातील बव्हंशी लोक करतात. अलिकडच्या काळात टीका करणारा, विरोधी लिहिणारा तो विरोधक मानण्याची प्रथा रुढ होत आहे. ही असहिष्णुता फारशी योग्य नाही, असा इशारा पवार यांनी या वेळी दिला.

Story img Loader