Pahalgam Attack News पहलगाम या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या भ्याड हल्ल्याचा निषेध जगभरातून केला जातो आहे. तसंच या हल्ल्याबाबत विविध प्रतिक्रियाही उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातही दहशतवाद्यांना आम्ही सोडणार नाही असं म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचंही एक वक्तव्य समोर आलं आहे.

काय म्हणाले शरद पवार?

“भारतवासीयांवर हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकारणात मतभिन्नता असेल. पण जेव्हा देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नाही. आत्ता भूमिका एकच देश एकत्र ठेवणं. त्यानंतर या गोष्टींचा विचार करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण पहलगामचा विषय ऐकत आहोत. अतिरेक्यांनी हल्ले केले. निष्पाप लोकांचा बळी घेतला. जे काही घडलं ती घटना देशाला धक्का होती. हा कुठलाही जाती-धर्माला धक्का नव्हता. हा भारताला धक्का होता. भारतवासीयांवर हल्ला झाला. आता देशवासीयांसाठी ही जबाबदारी असते की राजकारणात ही मतभिन्नता नाही. केंद्र सरकारने दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक बोलवली. त्या बैठकीला आपल्या पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, देशाच्या गृहमंत्र्यांनी अत्यंत समंजस भूमिका घेतली. त्यांनी हे सांगितलं की कुठेतरी कमतरता आमच्याकडून झाली. या कमतरतेवर आज चर्चा नाही. ज्यांच्यावर हल्ले झाले त्यांच्या कुटुंबीयांमध्ये विश्वासाचं वातावरण कसं निर्माण करता येईल हे आता पाहिलं पाहिजे.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

काही लोक या परिस्थितीत धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत जे धोकायदायक-पवार

आज देश संकटात असताना त्या कमतरतांवर चर्चा करण्याची वेळ नाही. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करता येणार नाही, जेव्हा निवडणूक होईल तेव्हा बघू, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार उपस्थित होते. त्यावेळी शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.

रावसाहेब पवार काय म्हणाले?

रावसाहेब पवार म्हणाले की, शरद पवार हे एक विचार आहेत. ज्या पद्धतीने आजचे राजकारण सुरू आहे, ते देशासमोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे. आज विचारहीन राजकारण सुरू. लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल, संविधानात जिवंत ठेवायचं असेल, तर समाजवादाशिवाय पर्याय नाही. दगडात परमेश्वर नाही. ही परिस्थिती अशीच राहिली तर ब्रिटिश परवडले. पण, या पुढचा काळ परवडणार नाही, असंही रावसाहेब पवार म्हणाले.