राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे आठ खासदार निवडून आले आहेत. त्या सगळ्यांची ओळख आज जयंत पाटील यांनी करुन दिली आणि त्यांचं स्वागतही केलं. तसंच उद्धव ठाकरे यांच्या पक्षालाही मोठं यश मिळाल्याचं ते म्हणाले. महाविकास आघाडीतल्या पक्षांनी एकत्र काम केल्याने महाविकास आघाडीला ३२ जागा मिळाल्या आहेत. शरद पवारांनी कष्ट घेतले, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या सभांमुळे महाराष्ट्रात सकारात्मक वातावरण निर्माण झालं असंही जयंत पाटील म्हणाले.
बजरंग सोनावणे जायंट किलर
बजरंग सोनावणेंचं कौतुक करताना जयंत पाटील म्हणाले की बजरंग सोनावणेंच्या रुपाने आम्हाला बजरंग बली पावले आहेत. ते जायंट किलर ठरले आहेत. ज्यांना पाडण्यासाठी अदृश्य शक्ती कामाला लागली होते ते आमचे अमोल कोल्हेही निवडून आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक लवकरच होणा आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन १० जून रोजी आम्ही दिमाखात अहमदनगरमध्ये साजरा करणार आहोत. त्यावेळी जाहीर सभाही होणार आहे अशीही माहिती जयंत पाटील यांनी दिली.
हे पण वाचा- अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत का? सुनील तटकरे म्हणाले, “आमचे सर्व आमदार…”
महाराष्ट्र सरकारवर जनता जास्त नाराज
केंद्र सरकार पेक्षा महाराष्ट्र सरकारबाबत लोकांची अधिक नाराजी असल्याचं आमच्या सर्वेक्षणात समोर आलं आहे. हे चित्र महाराष्ट्रभर आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसेल असा माझा विश्वास आहे. जीएसटी सारख्या अनेक गोष्टी आहेत ज्यावर लोकं नाराज आहेत. काँग्रेस सरकार असताना अशी परिस्थिती नव्हती. तसंच आम्हाला जे यश मिळालं आहे ते शरद पवारांमुळे. शरद पवार ज्या बाजूला असतात तिथे स्ट्राईक रेट जास्तच असतो असंही जयंत पाटील म्हणाले.
एक्झिट पोलचे आकडे शेअर मार्केट मॅन्यूपुलेट करण्यासाठी
“एक्झिट पोलचे आकडे हे शेअर मार्केट मॅन्यूपलेट करण्यासाठी वापरले जातात. त्याच्यावर विश्वास ठेवू नये असे मी आधीच सांगितलं होतं. पण या एक्झिट पोलला काही अर्थ नाही. १० पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला असून सर्वात जास्त आमचा स्ट्राईक रेट राहिला आहे. मी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो.” असंही जयंत पाटील म्हणाले.
“आमची अनेक मते पिपाणीला गेले आहेत. दिंडोरीत एक लाखाहून अधिक मतं पिपाणीला गेले आहेत.पिपाणीचे नाव तुतारी असल्याने लोकांचा गैरसमज झाला. आम्ही यानंतर याला ऑब्जेक्शन घेणार आहे. पिपाणीला साताऱ्यात मते गेले त्यामुळे साताऱ्यात आम्हाला फटका बसला आहे. निवडणूक आयोगाला ही गोष्ट निदर्शनास आणून देणार आहोत.” असंही त्यांनी स्पष्ट केलं.