२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी घेतला होता. या शपथविधीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. या शपथविधीबाबत अद्याप अनेक गूढ कायम आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सूचना केली होती, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, भाजपाचा तत्कालीन मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने सरकार स्थापनेसाठी पक्षाला पाठिंबा देण्यास नकार दिला. यामुळे सत्तेवर कोण येणार? असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी शरद पवारांनी भाजपाशी संपर्क साधला आणि राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपाने युती करावी, असं सुचवलं, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये केलं आहे.
हेही वाचा- “…आता तुम्ही गप्प बसा”, शरद पवारांच्या ‘त्या’ मागणीवर मनोज जरांगेंची रोखठोक भूमिका
फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार, शरद पवारांनीच राज्यात काही काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी सूचना केली होती. जेणेकरून राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना भाजपाशी युती करण्याबाबत माहिती मिळू शकेल. मात्र, सर्व वाटाघाटी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माघार घेतली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा- “पारदर्शक आणि निष्पक्ष राहा, सूड भावनेनं कारवाई नको”, सुप्रीम कोर्टाची ईडीवर तिखट टिप्पणी
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, राज्यात जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू होते. तेव्हा प्रत्येक राजकीय पक्षाला सरकार बनवायचं आहे का? असे पत्र दिलं जातं. राष्ट्रवादीला जे पत्र मिळालं, ते पत्र मीच लिहिलं होतं. ते माझ्या घरी टाईप करण्यात आलं होतं. या पत्रात शरद पवारांनी काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. त्या दुरुस्त्या केल्यानंतर राष्ट्रवादीही सरकार स्थापन करण्यास इच्छुक नाही, असं पत्र दाखल करण्यात आलं. त्यानंतरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.