राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कोण होणार याच्याही जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी शिवसेना नेते संजय राऊत विराजमान व्हावेत अशी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची इच्छा असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, याबाबत राऊंतांशी माध्यमांनी संवाद साधला असता त्यांनी ही चुकीची माहिती असल्याचे म्हटले आहे. तर उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आता दृष्टीपथात येत असल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. विविध पदांबाबत चर्चिल्या जात असलेल्या या चर्चांबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, आता भाजपाने शिवसेनेची अडीच वर्षांची मागणी मान्य केल्याचेही बोलले जात आहे. मात्र, या वृत्तांचे संजय राऊत यांनी खंडन केले असून अशी कुठलीही ऑफर भाजपाने शिवसेनेला दिली नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार अशीही चर्चा होती. याबद्दल पक्षांच्या बैठकीमध्ये काही चर्चा झाली का?”, असा प्रश्न राऊत यांना पत्रकारांनी विचारला. यावर बोलताना त्यांनी सांगतिल, आदित्य ठाकरेंचं नेतृत्व सर्व महाराष्ट्राला मान्य असलं तरी सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावं असं तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे मत आहे.

भाजपाने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याच्या चर्चेवर टोला लगावताना संजय राऊत यांनी म्हटले की, आता दुसऱ्या कोणी मुख्यमंत्रिपदच काय इंद्रपद दिलं तरी माघार घेणार नाही. शिवसेनेनं स्वाभिमानानं घेतलेला हा निर्णय असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.