इंधन व अन्य वस्तू आदींच्या किंमती वाढतात, मग शेतकऱ्यांच्या उत्पादीत कामाला भाव का नको? असा प्रश्न करत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कांदा भाववाढीचे जोरदार समर्थन केले. उत्पादन खर्चाचा हिशेब करून त्यावर आधारीत सर्व शेतीमालाला भाव दिला पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. उन्हाळ कांद्याचे किरकोळ बाजारातील भाव प्रति किलो ८० ते १०० रूपयांच्या घरात गेल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. मात्र, जेव्हा कांद्याला भाव मिळत नाही व तो फेकून द्यावा लागतो, तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येतात, असा दाखला त्यांनी  दिला.
शहादे येथील लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूत गिरणीच्या २५ हजार चात्यांच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन मंगळवारी पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित किसान मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात माजी आमदार पी. के. अण्णा पाटील यांचे दत्तकपूत्र दीपक पाटील यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आदी उपस्थित होते.
कष्टकरी शेतकऱ्यांमुळेच आपला देश घडतो आहे. देशाची अन्नाची गरज शेतकरी भागवत आहे. ही गरज भागवून शिल्लक राहिलेला माल निर्यात केला जातो. यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. देशात महागाई आली. गहू, तांदूळ कांद्याचे भाव वाढले की सर्वत्र चर्चा सुरू होते. पण, शेतकरी अनेकदा अडचणीत सापडतो, असे पवार यांनी नमूद केले. कुटुंबातील सर्वानी शेतीवर अवलंबून राहू नये. घरातील इतर सदस्यांनी इतर व्यवसाय करावा, उच्च शिक्षण घेऊन आपली उंची कशी वाढविता येईल, याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. केंद्र शासनासमोर प्रस्तावित असलेला कमाल जमीन धारणा (सिलिंग) कायदा करून उपयोग होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील ८४ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. ६० टक्के शेतीला पाणी नाही. जिरायतदार शेतकऱ्यांची फरफट होत आहे. शेतकरी बांधवांमध्ये उपरोक्त कायद्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी खातेफोड करीत आहे आणि काहींचा तो धंदा झालेला आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, असे आवाहन पवार यांनी केले.
‘आगीतून फुफाटय़ात..’
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले दीपक पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना उद्देशून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘तुम्ही आगीतून निघाले आणि फुफाटय़ात पडले’ अशी अवस्था होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.
तापी नदीवरील बॅरेजेसचे पाणी परिसरातील शेतीसाठी वापरता येईल, यासाठी मार्ग काढला जाईल. धुळे-नंदुरबार जिल्हा सहकारी बँकेला शासनाच्या तिजोरीतून पैसा पुरवून तिला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

Story img Loader