Sharad Pawar And Supriya Sule Criticised By Radhakrishna Vikhe Patil: राष्ट्रवादीच्या (शरद पवार) खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात, महायुतीच्या मंत्र्यांवर टीका केली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटेच काम करत असल्याचे म्हणत त्यांचे कौतुक केले आहे. शपथविधी झालेल्या काही मंत्र्यांनी त्यांना मिळालेल्या खात्यांचा पदभारही स्वीकारलेला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे पुढील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीच पत्रव्यवहार करावा लागेल, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना भाजपाचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यावर टीका करत, त्यांनी आता घरी बसावे असे म्हटले आहे.
त्यांनी आता घरी बसावे…
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत, ते एकटेच काम करत असून, काही मंत्र्यांनी पदभारही स्वीकारला नसल्याचे म्हटले होते. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर भाजपाचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, “मला सुप्रिया ताईंची कीव येते. जनतेने पवार साहेबांना, त्यांना (सुप्रिया सुळे) घरी बसण्याचा जनादेश दिला आहे. त्यांनी शांत घरी बसावे, शेती-वाडी पाहावी. कारण त्यांच्या वांग्याला पूर्वी बरेच पैसे मिळाले होते. आणखी तशा प्रकारची वांगी त्यांनी पिकवावी. वांग्यात किती पैसे आहेत, बटाट्यात किती पैसे आहेत, याचे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करावे.”
काय म्हणाल्या होत्या सुप्रिया सुळे?
आज सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंतीनिमित्त सुप्रिया सुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यातील महात्मा फुले वाड्यात आल्या होत्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राज्य सरकारमध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच सक्रिय असल्याचे दिसत आहे. महायुती सरकारमधील बहुतांश मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. गेल्या एक महिन्यापासून फक्त फडणवीसच काम करत असल्याचे दिसत आहे.”
फडणवीसांचे कौतुक
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस गडचिरोलीत करत असलेल्या कामाचेही कौतुक केले. त्या म्हणाल्या, “स्वर्गीय आर. आर. पाटलांनी ते राज्याचे गृहमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्यात विकास कामे सुरू केली. आता देवेंद्र फडणवीस त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.”