राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाी आज नांदेडमध्ये पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांच्या विविध प्रश्नांवर उत्तर देताना, केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावल्याचं दिसून आलं. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान आदींची उपस्थिती होती.

महाविकास आघाडी सरकारचा ६ जून हा शेवटचा दिवस असणार आहे असं केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी म्हटलं असल्याचं सांगून यावर माध्यम प्रतिनिधीने पवारांची प्रतिक्रिया विचारली असता शरद पवारांनी म्हटले की, “नारायण राणे, चंद्रकांत पाटील हे सातत्याने तारखा देत असतात आम्ही ऐकत असतो, वाचत असतो, आनंदही घेत असतो.”

आघाडी सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “त्याबद्दल काहीच अडचण नाही आम्ही एकत्र सरकार चालवतो आहोत. व्यवस्थित चाललं आहे त्यामुळे निश्चितच समाधानी आहे. या सरकारला आणखी पाच वर्षे मिळायला काही हरकत नाही, ही पाच वर्षे देखील सरकार राहील आणि यानंतर देखील राहीलच.”

बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “माझ्या वाचनात आलं आहे. हे केव्हाही चिंताजनकच आहे. यंदाच्या वर्षी विशेषता जालना जिल्ह्यात आणि बीडच्य काही भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात सातारा परिसरात अतिरिक्त ऊस आहे. राज्य सरकार ज्याप्रकारे सगळ्या साखर कारखान्यांना सूचना देत आहे, की कारखाने बंद करू नका गरीब शेतकऱ्यांना फायदा होईल याची काळजी घ्या. हे काम सरकारकडून सुरू आहे.”

Story img Loader