Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. तसंच वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा दोन्ही पक्षांची कामगिरी काय असणार ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान शरद पवार ( Sharad Pawar ) केव्हाच प्रचाराला उतरले आहेत. फलटणमध्ये शरद पवारांनी जेव्हा सभा घेतली त्यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी अजित पवारांना ‘लाडकी बहीण’ वरुन टोला लगावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसभेचा निकाल लागल्यावर लाडकी बहीण आठवली

आपल्यापुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा? सामान्य लोकांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा की आणखी कुणाच्या हातात द्यायचा? आज सांगितलं जातं की आम्ही नवीन नवीन योजना काढल्या. रोज वर्तमानपत्र उघडलं की नवीन योजना बघायला मिळतात. कधी बहिणीबाबत असतात. कुठल्याही व्यक्तीला बहिणीबाबत आस्था असतेच. बहीण ही कुटुंबातली जिवाभावाची व्यक्ती असतेच. बहिणीचा सन्मान केला तर माझ्यासारख्याला, तुम्हाला आणि सगळ्यांना मनापासून आनंद होतो. पण एक गंमत आहे बघा मागच्या दहा वर्षांत बहीण आठवली नाही. पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य होतं तेव्हा बहीण दिसली नाही. नंतरच्या काळात बहीण दिसली नाही. बहीण दिसली कधी? लोकसभेला महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीने जिंकल्या म्हणून बहीण आठवली. असा टोला शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी लगावला.

बारामतीतही एक लाडकी बहीण उभी होती

शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले, तुमच्यापेक्षा बारामतीकर हुशार आहेत. तिथे एक बहीण उभी होती. ती निवडणुकीला उभी राहिल्यानंतर कुणी काहीही म्हणो बारामतीकर निवडणूक प्रचाराला गेलो की गप्प बसायचे. मी म्हटलं झालं काय? कुणी काही बोलत नाही. मतमोजणी झाली तेव्हा कळलं की १ लाख ६० हजार मतं बहिणीला बारामतीकरांनी दिली. याचा अर्थ हा आहे की लोक राजकारण्यांपेक्षा जास्त शहाणे आहेत. लोकांना कळतं काय करायचं? कुणासाठी करायचं आणि कधी करायचं. आज महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची त्याचा विचार करण्याची गरज आहे. मी काही निवडणुकीला उभा नाही. १४ वेळा निवडणुकीला सामोरा गेलो. सातवेळा दिल्लीची आणि सातवेळा महाराष्ट्राची. सालगड्याला पण सुट्टी देतात पण मला कुणी सुट्टीच दिली नाही, असंही शरद पवार ( Sharad Pawar ) त्यांच्या भाषणात म्हणाले.

हे पण वाचा- Ladki Bahin Yojna: लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध नाही, पगारही धोक्यात? शरद पवार काय म्हणाले?

मला साठ वर्षात एक दिवसही तुम्ही सुट्टी दिली नाहीत

मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्र कुठे ना कुठे अत्याचार होत आहे. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला, काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही. ज्यांचे हात बरबटले आहेत त्यांच्या हातात सत्ता आहे, असं शरद पवार ( Sharad Pawar ) म्हणाले

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar taunts to ajit pawar about ladki bahin yojana what did he say about baramati loksabha scj