राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळोवेळी विविध मुद्द्यांवर केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. राज्यातही महाविकासआघाडीकडून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका होते. अशातच पत्रकारांनी शरद पवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकारच्या ९ वर्षांच्या कालखंडात मंत्रिमंडळातील कोणता नेता आवडतो असा प्रश्न विचारला. यानंतर शरद पवारांनी मोदी सरकारमधील आवडत्या नेत्याचं नाव सांगत कारणंही नमूद केली. ते बुधवारी (७ जून) औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “काही लोकांचं काम चांगलं आहे. उदाहरणार्थ नितीन गडकरी. मी पाहतो की, त्यांना विकासाच्या कामात रस आहे. शेवटी शासन तुमच्या हातात आल्यावर सरकारने काही तरी ‘रिझल्ट’ दिला पाहिजे. त्यात नितीन गडकरी पुढे आहेत. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते पक्षीय दृष्टिकोन ठेवत नाहीत.”
“असा अनुभव केवळ गडकरींबद्दलचाच आहे”
“आपण नितीन गडकरींना एखादा प्रश्न आपण सांगितला, तर ते तो प्रश्न कोण सांगतोय यापेक्षा तो प्रश्न किती महत्त्वाचा आहे याकडे लक्ष देतात. ही एक समंजसपणाची गोष्ट आहे. मात्र, असा अनुभव केवळ त्यांच्याबद्दलचाच आहे,” असंही शरद पवारांनी सांगितलं.
“मोबाईलवरील मेसेजवर लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही”
देशातील दंगलींवर बोलताना शरद पवार म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये घटना घडली आहे. त्यानंतर कोल्हापूरमध्येही तणाव आहे. कुणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवला. तो मेसेज चुकीचाही असेल, पण त्यासाठी लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं हे काही योग्य नाही.”
“राज्यकर्तेच रस्त्यावर उतरून समाजात कटुता निर्माण करत आहेत”
“आज सत्ताधारी पक्ष अशा सर्व गोष्टींना प्रोत्साहन देत आहे. राज्यकर्त्यांची जबाबदारी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे आहे. मात्र, राज्यकर्ते व त्यांचे सहकारी रस्त्यावर उतरायला लागले आणि त्यामुळे समाजात जातीत कटुता निर्माण झाली तर हे चांगलं लक्षण नाही,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : भाजपा नेत्यांकडून एकेरी उल्लेख करत टीका, शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
“औरंगाबादमध्ये औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून पुण्यात दंगल करण्याचं काय कारण?”
“समाजात कटुता निर्माण केली जात आहे. औरंगाबादमध्ये कुणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. त्यासाठी पुण्यात दंगल करायचं काय कारण आहे. पुण्यात आंदोलन करायचं काय कारण आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.