राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २५ वा वर्धापन दिन राष्ट्रवादीच्या दोन्हीही गटाने साजरा केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. या मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. तसेच शरद पवार यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीबाबत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही सूचना केल्या. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत राम मंदिराचं राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला. याबरोबरच आपण कधी अयोध्याला गेलो तर राम मंदिरात जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा : “केंद्रात दोन अतृप्त आत्मे”, संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू…”
शरद पवार काय म्हणाले?
“येणाऱ्या निवडणुकीला आपण लोकांना बरोबर घेऊन सामोरं जाऊ. लोकांना आत्मविश्वास देऊन आपल्याला पुढे जायचं आहे. या देशातील लोक सुदैवाने नरेंद्र मोदी यांच्यासारख्यांनी काढलेल्या प्रश्नांना जास्त महत्व देत नाहीत. आता लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली, त्यावेळी काय चर्चा होती? राम मंदिराच्या प्रश्नाबाबत चर्चा होती. रामाचं मंदिर अयोध्येत बांधलं आनंद आहे. उद्या मी अयोध्येला गेलो तर मंदिरात जाईन. रामाचा सन्मान ठेवीन. मात्र, राजकारणासाठी रामाचा कधी वापर करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामाच्या नावाचा वापर राजकारणासाठी केला. त्याची नोंद अयोध्येमधील जनतेनं घेतली. भारतीय जनता पक्षाच्या अयोध्येमधील उमेदवाराचा पराभव केला. हा इतिहास आपल्यासमोर आहे”, असं शरद पवार यांनी म्हटलं.
ते पुढे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरद पवार गट) नेता म्हणून तुम्हाला खात्री देतो, आमचे सर्व खासदार दिल्लीमध्ये जातील, तुमच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक राहतील. नवीन काही लोक आहेत त्यांना काही मार्गदर्शन हवं असेल तर मी आहे. मला लोकसभा आणि विधानसभेत जाऊन आता ५६ वर्ष होत आहेत. एकाही दिवसाची सुट्टी घेतली नाही असं काम महाराष्ट्राच्या जनतेनं माझ्यावर सोपवलं. मला ज्या गोष्टीचे ज्ञान असेल ते यांना देण्याचं काम मी करेन”, असं शरद पवारांनी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
“राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकमेकांवर टीका करतो. पण टीका करताना आम्ही मर्यादा ठेवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्याबाबत काय बोलले? की भटकती आत्मा. माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला की, हा भटकता आत्मा आहे. एका दृष्टीने हे बरं झालं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला सोडणार नाही. कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे”, असा घणाघात शरद पवार यांनी केला.