उस्मानाबाद : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या तीव्र दुष्काळाने जिल्हा हैराण झाला आहे. शेतकरी, शेतमजुरांसह रोजगारासाठी फिरणाऱ्या जिल्ह्यातील तरुणांचे प्रचंड हाल होत आहेत. खरीप आणि रब्बी हंगामात नापिकी झाल्याने जिल्ह्यात दिवसेंदिवस शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी, (१ मे ) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व रोजगाराचे प्रचंड हाल होत आहेत. खरिपातून अत्यल्प उत्पन्न मिळाले होते व रब्बीची तर बहुतांश ठिकाणी पेरणीच झाली नाही. त्यामुळे दैनंदिन गरजा भागविण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. यातून अनेक शेतकऱ्यांमध्ये नराश्याची भावना निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी जनावरांना चारा व रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून हाताला काम देण्यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीच्या गांभीर्याच्या प्रमाणात तत्परता दाखविली जात नाही. मागणीप्रमाणे तातडीने पिण्याचे पाणी, जनावरांना चारा व हाताला काम दिले जात नाही. अधिग्रहण व टँकरचे प्रस्ताव तातडीने निकाली काढले जात नाहीत. जनावरांच्या प्रमाणात गावोगांवी चारा छावण्यांना मंजुरी दिली जात नाही. जिल्ह्यातील या भीषण दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार १ मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सकाळी १०.३० वाजता भूम तालुक्यातील घाटिपपरी, १२ वाजता कळंब तालुक्यातील चोराखळी व दुपारी २ वाजता उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत. तरी संबंधित गावच्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. या दौऱ्यानंतर शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्ह्यातील समस्यांची दाहकता, अडीअडचणी मांडून उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.