बारामती कृषी विकास ट्रस्टतर्फे उभारण्यात आलेल्या जलतरण तलावाचे उद्घाटन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. दरम्यान, यावेळी बोलताना शरद पवार यांनी लहानपणींच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तसेच पोहोण्यासंदर्भातली एक विशेष आठवणही सांगितली.
हेही वाचा – “मी लहानपणी पाण्याला फार घाबरायचो, तेव्हा ते मला…”, अजित पवारांनी सांगितली ‘ती’ आठवण!
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
“आंतरराष्ट्रीय स्थरावरचे जलतरण तलाव बघितल्यांनंतर त्यांची आणि आपण सुरू केलेल्या तलावची तुलना केली, तर मला वाटत की हा उत्तम तलावापैकी एक आहे. याचा लाभ मुलामुलींना घ्यायला हवा. या मुलांनी स्वत:ची प्रकृती मजबूत केली पाहिजे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपले स्थान प्रस्तापित करण्याकडे मुलांनी लक्ष द्यायला हवे”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
“लहानपणी जलतरण तलाव वगैरे नव्हते”
“माझ्या आधी पोहोण्यासंदर्भात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी काही आठवणी सांगितल्या. आम्ही लहान असताना जलतरण तलाव वगैरे काही नव्हते. आम्ही बारामतीतच्या एमएच हायस्कूलच्या पुलाजवळ जो तलाव आहे, तिथे पोहायला जात होतो. त्यावेळी जो पुलावरून उडी टाकेल, तो उत्तम खेळाडू समाजला जायचा, अशी त्यावेळी परिस्थिती होती. अलीकडच्या काळात तिथून जाताना कोणी पोहोताना दिसत नाही. मात्र, आमच्यावेळी कालवे आणि घरची विहीर याचाच वापर पोहोण्यासाठी केला जात होता”, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.