२०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रयोग पाहण्यास मिळाले. पहिला प्रयोग होता तो म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीचा. तर दुसरा प्रयोग कुणालाही शक्य वाटला नव्हता अशा महाविकास आघाडीचा होता. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी आमच्याशी चर्चा बंद केल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी बरोबर जात ते मुख्यमंत्री झाले असा आरोप देवेंद्र फडणवीस आणि भाजपाकडून कायमच केला जातो. तसंच एकनाथ शिंदेही हा आरोप करतात की त्यांना मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं होतं पण बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या सगळ्याबाबत आता महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनीच उत्तर दिलं आहे. नेमकं काय घडलं होतं ते शरद पवारांनी स्पष्ट केलं आहे.
महाविकास आघाडीचा प्रयोग
महाराष्ट्रात महायुतीला २०१९ च्या विधासभा निवडणुकीत यश मिळालं होतं. भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले होते. मात्र निकाल लागल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेचं अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटून घ्यायचं ठरलं आहे हा मुद्दा उद्धव ठाकरे आणि त्यांचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जवळपास रोज उचलून धरला. त्यामुळे टोकाचे कलह निर्माण होऊन भाजपा आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाला. यानंतर राज्याने महाविकास आघाडीचा प्रयोग पाहिला. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी ३० नोव्हेंबर २०१९ ला शपथ घेतली. पण त्याआधी पडद्यामागे काय घडलं होतं? उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं कसं ठरलं हा घटनाक्रम शरद पवारांनी लोकसत्ता लोकसंवाद कार्यक्रमात उलगडला आहे. तसंच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले?
“महाविकास आघाडीचं सगळं काही ठरल्यानंतर मुख्यमंत्री कुणाला करायचं याबाबत बैठक झाली. आमच्याकडे त्यासंदर्भात एकनाथ शिंदेंचं नाव आलेलं नव्हतं. शिवसेनेत तशी चर्चा झाली असावी पण आमच्यापर्यंत त्याचं नाव आलं नव्हतं. तसंच एकनाथ शिंदेंबाबत आमची काही तक्रार नव्हती. आत्ताही आमच्याशी त्यांचे चांगले राजकीय संबंध आहेत. मात्र तेव्हा तेवढी जवळीक नव्हती. विधीमंडळ पक्षांची बैठक बोलवण्यात आली तेव्हा राज्याचं नेतृत्व कुणाला द्यायचं याचा प्रस्ताव मांडण्यात आला. माझ्या शेजारी उद्धव ठाकरे बसले होते मी त्यांचा हात हातात घेतला आणि तो उंचवाला आणि त्यांच्या नावाचा विचार व्हावा हे सांगितलं. सगळ्यांनीच टाळ्या वाजवल्या आणि प्रतिसाद दिला. तेव्हा कुणीही एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नाही.” ही पडद्यामागची घडामोड शरद पवारांनी सांगितली.
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून का निवडलं?
“उद्धव ठाकरेंना मी निवडलं याचं कारण, बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरेंचं नेतृत्व हे शिवसैनिकांनी मान्य केलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्यासाठी सगळ्यांनी तयार व्हावं हे मी सुचवलं. विशेष गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे स्वतः या पदासाठी आग्रही नव्हते. शिवसेनेच्या अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या नावाची चर्चा झाली होती ही गोष्ट मला नंतर समजली.” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले? तसंच का निवडले गेले? हे शरद पवारांनी सांगितलं आहे आणि भाजपा तसेच एकनाथ शिंदेंच्या आरोपांना एकप्रकारे उत्तरच दिलं आहे.