शरद पवारांच्या नव्या पक्षाचं नाव ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ असं आहे. शिवाय नुकतंच या पक्षाला चिन्हही मिळालं आहे, हे चिन्ह आहे ‘तुतारी’. तुतारी हे चिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी ‘वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी’ हा नाराही दिला. तसंच तुतारी या नव्या चिन्हाचं अनावरण रायगडावर एका सोहळ्यात करण्यात आलं. या सोहळ्यासाठी शरद पवार पालखीतून रायगडावर गेल्याचं संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुतारी हे चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांनी असं पालखीतून रायगडावर जाणं हे सूचक आहे. याचं कारण रायगड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला गड आहे. या गडाला प्रचंड ऐतिहासिक महत्व आहे. रायगडावर जाऊन तुतारी फुंकणं म्हणजे युद्धाला सज्ज असणं असा संदेशच जणू काही शरद पवार यांनी दिला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या घडामोडी घडणं हे महत्त्वाचं आहे. शरद पवारांनी रायगडावर जाणं हे राज ठाकरेंनी केलेल्या एका आरोपाची आठवण करुन देणारं आहे.

काय होता राज ठाकरेंचा आरोप?

१२ एप्रिल २०२३ या दिवशी ठाण्यातल्या भाषणात राज ठाकरेंनी आरोप केला होता, “शरद पवार ज्या ज्या वेळी भाषणाला उभे राहतात, त्यावेळी ते काय म्हणतात? हा ‘शाहू’, ‘फुले’ ‘आंबेडकरां’चा महाराष्ट्र आहे. निश्चितच तो आहे, पण त्याआधी हा महाराष्ट्र कुणाचा असेल तर तो आमच्या छत्रपती शिवरायांचा आहे. मात्र शरद पवार हे कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं आणि मुस्लीम मतं गेली तर काय करायचं? त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर यांचीच नावं ते कायम घेतात. छत्रपतींचं नाव जर राजकारण करायचं असेल त्यात जात आणायची असेल, महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांची माथी भडकवायची असतील तर घेतात. पुस्तकं ब्राह्मणांनी लिहिलं आहे वगैरे वक्तव्य करतात. त्यांच्याच एका भाषणात ते म्हणत होते अफजल खान इथे आला होता. त्यावेळी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला. पण त्यात हिंदू-मुस्लीम काही नव्हतं. मग माझा शरद पवारांना सवाल आहे की अफझल खान इथे केसरी टूर्स किंवा वीणा वर्ल्डचं तिकिट काढून महाराष्ट्र दर्शन करायला आला होता का?” असं म्हणत राज ठाकरेंनी गेल्याच वर्षी शरद पवारांवर आरोप केला होता.

राज ठाकरेंनी शरद पवारांच्या रायगड दौऱ्याबाबत काय म्हटलं आहे?

हे ही वाचा- Raj Thackeray on Sharad Pawar: शरद पवार रायगडावर; राज ठाकरेंनी साधला निशाणा

शरद पवारांनी रायगडावर जाणं सूचक का?

निवडणुकीच्या तोंडावर पक्षचिन्ह तुतारी मिळालेलं असताना ते चिन्ह लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्यांनी थेट रायगडावर जाणं पसंत केलं. त्यांचा पालखीत बसून रायगडावर जातानाचा फोटोही चांगलाच व्हायरल झाला आहे. या सगळ्यामागे अभ्यास आहे तो मतांचा आणि राजकारण आहे ते शरद पवार करत असलेल्या बेरजेचं. भाषणात शाहू, फुले आणि आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि पक्षचिन्ह रायगडावरुन दाखवायचं ही बाब साधी नक्कीच नाही. त्यामागे विचार आहे तो मतं मिळवण्याचाच. आता शरद पवार यांनी ही खेळी का खेळली आहे, हे येत्या काळात आणखी स्पष्ट होईल. मात्र भाषणात शाहू, फुले आणि आंबेडकर यांचंच नाव का घेतो? यावर शरद पवारांनी राज ठाकरेंनाच उत्तर दिलं होतं. ते काय होतं तेही आपण जाणून घेऊ.

राज ठाकरेंचा प्रश्न काय होता?

राज ठाकरे: भाषणात तुम्ही शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता छत्रपती शिवरायांचं नाव का घेत नाही?

शरद पवारांचं उत्तर काय होतं?

शरद पवारः छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे याबद्दल कुणाच्हीया मनात शंका नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचा प्रकर्षाने उल्लेख करण्याचं कारण महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची काळजी त्यामागे आहे. या तिघांनी सामाजिक ऐक्य आणि सामाजिक प्रबोधन यासाठी कष्ट केले, लोकांना एकसंघ ठेवलं. प्रबोधनकार ठाकरेंनी त्या कालखंडात सामाजिक ऐक्य रहावं आणि सांप्रदायिक विचार बाजूला ठेवावा यासाठी प्रचंड योगदान दिलं आहे. त्यांची भाषा तिखट होती. पण त्या भाषेतून समाजाच्या विघातक प्रवृत्तींच्या विरोधात ती भाषा वापरली होती. फुले, शाहू, आंबेडकर यांनीही समाजमन एकसंध करण्यासाठी जात-पात-धर्म याचा लवलेश न राहता मराठी माणूस एकत्र कसा राहील याची त्यांनी काळजी घेतली. आजही त्याची गरज आहे. राज्यात जे काही प्रकार घडले ते हेच सांगतात की शाहू, फुले आंबेडकर यांच्या विचारांचं स्मरण करुन देण्याची गरज आहे. तसं केलं नाही तर महाराष्ट्र दुबळा होईल. महाराष्ट्र दुबळा आपल्याला होऊ द्यायचा नाही. महाराष्ट्र मजबूतच राहिला पाहिजे. त्यामुळे मी कायमच फुले, शाहू, आंबेडकर यांचा विचार असं मी म्हणतो. असं उत्तर शरद पवार यांनी दिलं होतं.

भाषणात शाहू, फुले, आंबेडकर यांचं नाव आपण घेतो, छत्रपती शिवाजी महाराजाचं नाही हे दस्तुरखुद्द शरद पवारांनीही मान्यच केलं होतं. तुतारी हे चिन्ह मात्र रायगडावर जाऊन त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं आहे. या तुतारीची गर्जना शरद पवारांना किती बळ देते हे पाहणं औत्सुक्याचं असेल यात शंकाच नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar visit to raigad for tutari symbol and raj thackeray that allegation know the connection maindc scj