चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावतील. बीडमध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्या सभा नियोजित आहेत. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी अजित पवार आणि शरद पवारांना मनू संबोधून हे दोघेही ओबीसीविरोधात असल्याचं त्यांनी म्हटलंय. ते झी २४ ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
माजी आमदार नारायण मुंडे म्हणाले, काँग्रेसमध्ये अनेक मनु आहेत. ते ओबीसीला संपवत आहेत. म्हणून आम्हाला पंकजा मुंडे यांना मतदान करून ओबीसीला न्याय द्यायचा आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार आज बीडमध्ये सभा घेणार आहेत. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, “शरद पवार आणि अजित पवार मनू आहेत. अंतरवाली सराटीतील आंदोलन शरद पवारांनीच सुरू केलंय. तिथे मराठा समाजाचं आंदोलन त्यांनी केल्यामुळे तिथून त्यांना पळवून लावलं, पोलीस संरक्षणात ते पळून गेले. शरद पवार असो वा अजित पवार असो ते काय ओबीसीच्या बाजूचे नाहीत.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मराठा समाजातील काही नेत्यांनीही शरद पवारांवर टीका केली होती. शरद पवारांच्या पाठिंब्यानेच मराठा आंदोलन उभं राहिलं असल्याचं ते म्हणाले होते.
हेही वाचा >> “देशभरात रामभक्त आहेत हे विसरु नका”, नवनीत राणांचा असदुद्दीन ओवैसींना पुन्हा इशारा
बीडमध्ये काँग्रेसला धक्का
दरम्यान, बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे आणि महायुतीकडून भाजपाच्या पकंजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु, या मतदारसंघात काँग्रेस नेत्याने आता भाजपा उमेदवाराला पाठिंबा दिल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे. नारायण मुंडे हे गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. नारायण मुंडे यांनी पाठिंबा दिल्याने गेवराई, बीड, माजलगाव येथे पंकजा मुंडे यांना बळ मिळालं आहे.
एकनाथ शिंदे पंकजा मुंडेंबद्दल काय म्हणाले?
“देशात तापमान वाढले आहे. राज्याचेही तापमान ४० पुढे गेले आहे. मात्र, ४ जूनला महाराष्ट्राचा पारा ४५ पार होईल. तसेच देशाचा ४०० पार होईल. महायुतीच्या या तळपत्या विजयामध्ये विरोधकांची लंका खाक झाल्याशिवाय राहणार नाही. तुतारीची पिपाणी होणार आहे. आपल्या देशात फक्त मोदी गॅरंटी चालते. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान करण्याची गॅरंटी जनतेने घेतली आहे. बीडची जनता एकदा ज्यांना स्वीकारते त्यांची पुन्हा कधीही साथ सोडत नाही. बीडच्या जनतेने कायम गोपीनाथ मुंडे यांना प्रेम दिले. आता पंकजा मुंडे यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण आले आहेत”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.