काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांसह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असली तरी शरद पवार कालांतराने भाजपाला पाठिंबा देतील, अशा अर्थाचं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
“शरद पवारांनी आता भाजपाबरोबर येण्यास नकार दिला आहे. पण कालांतराने विचार बदलत असतात. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. काही वेळ जाऊ द्यावा लागतो. देश कल्याणासाठी काय केलं पाहिजे? असा विचार कधी ना कधी त्यांच्याकडून होईलच,” असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते परभणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“सध्या विरोधीपक्षात खूप संभ्रम आहे. जसं-जसं २०२४ वर्ष जवळ येईल, तसं-तसं तुम्हाला विरोधीपक्षाच्या विधानमंडळातल्या खुर्च्या कमी होताना दिसतील” असंही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा- “संभाजी भिडेंचा भाजपाशी संबंध…”, शिंदे गटाच्या नेत्याचं थेट विधान
शरद पवारांच्या एनडीए प्रवेशाबाबत बावनकुळे पुढे म्हणाले, “मला वाटतं की, त्यांची (शरद पवारांची) भूमिका आज वेगळी असली तरी जीवनामध्ये कालांतराने काही ना काही वेगळंपण येत असतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे कालांतराने शरद पवारही याचा विचार करतील. राज्य आणि देशाच्या हितासाठी सर्वच लोक एकत्र आले पाहिजे. शेवटी राष्ट्रहीत महत्त्वाचं आहे.”
हेही वाचा- पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांना उद्धव ठाकरेंचा इशारा; म्हणाले, “एवढीच अपेक्षा आहे की…”
“त्यांचा पक्ष एकच आहे. कालांतराने विचार बदलत असतात. थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. आज त्यांनी (शरद पवार) नाही म्हटलंय. पण देश कल्याणासाठी काय केलं पाहिजे? असा विचार कधी ना कधी ते करतीलच,” असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. बावनकुळेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.