Sharad Pawar : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावललं गेलं. त्यानंतर छगन भुजबळ यांनी जहा नहीं चैना वहा नहीं रैना म्हणत नाराजी बोलून दाखवली होती. तसंच मला निवडणुकीचं तिकिटच कशाला दिलं वगैरेही बोलून दाखवलं होतं. यानंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या पक्षात जाणार की भाजपात जाणार? अशाही चर्चा सुरु झाल्या. दरम्यान पुण्यातल्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर होते. त्यावेळी दोन नेत्यांमधल्या एका कृतीने लक्ष वेधलं आहे.
पुण्यात नेमका काय कार्यक्रम होता?
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघं एकाच मंचावर आलेले पाहण्यास मिळाले. चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच कार्यक्रमात छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसले. शरद पवारांच्या हस्ते सावित्रीबाईं फुलेंच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छगन भुजबळ होते. सुरुवातीला हे दोन्ही दिग्गज नेते हे एकमेकांकडे पाहणंही टाळत होते. मात्र नंतर या दोन दिग्गजांनी जी कृती केली त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
काय घडलं मंचावर? शरद पवारांनी काय संदेश लिहिला आणि…
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला. तो संदेश त्यांनी बाजूलाच ठेवला. ज्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांनी हा संदेश वाचला. काही सेकंद दोघांचा संवाद झाला आणि दोन्ही नेते हसूही लागले. कॅमेरात ही दृश्यं टिपली गेली आहेत. दरम्यान दोन दिग्गज नेत्यांच्या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
हे पण वाचा- भारतरत्न मोठे की महात्मा? छगन भुजबळ यांचे भाष्य
छगन भुजबळांकडून भाषणात शरद पवारांचं कौतुक
छगन भुजबळ म्हणाले, “समता परिषदेच्या सभेत आम्ही शरद पवार यांच्याकडे मंडल आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली होती. त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली. शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलले.. त्यांना या कार्यक्रमाला बोलवले ते योग्यच केलं” असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.
छगन भुजबळ यांनी २०२३ मध्ये सोडली शरद पवारांची साथ
छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडू शकतात का? अशाही चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान शरद पवारांची साथ जेव्हा अजित पवारांनी सोडली तेव्हा छगन भुजबळही अजित पवारांसह गेले. त्याबाबत शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं तेव्हा चांगलाच हशाही पिकला होता. शरद पवार म्हणाले होते, “छगन भुजबळ मला म्हणाले की अजित पवारांनी नेमकं काय केलंय ते मी बघून येतो, ते असं म्हणाले आणि नंतर मी त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतानाच पाहिलं.” असं वक्तव्य शरद पवार यांनी २०२३ मध्ये केलं होतं. महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार २०२३ मध्ये सहभागी झाले. त्यांना छगन भुजबळांनीही साथ दिली. त्या सरकारमध्ये ते मंत्री होते. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ नाहीत. त्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात काही सेकंद झालेली ही चर्चा आणि संदेश लिहून तो वाचला जाणं या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत.