महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दृष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागत असल्याचे चित्र आहे, दरम्यान, राज्यातील या दुष्काळाच्या परिस्थितीबाबत सर्वत्र चिंता व्यक्त होत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेच अध्यक्ष शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे. दुष्काळाबाबत राज्य सरकारने तातडीने पावलं उचलली अन्यथा मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, अशा इशारा त्यांनी पत्राद्वारे दिला आहे.
हेही वाचा – “४ जूननंतर अजित पवार गटाला खिंडार पडणार”, सुनील तटकरेंचा उल्लेख करत शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा!
शरद पवार यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?
“राज्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबत राज्य सरकार अद्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही. मागील दहा दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवाडीसारखी महत्त्वाची धरणे आटली असून संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भालादेखील बसली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली असून मराठवाड्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी या तालुक्यातील पाणी टंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे”, असं शरद पवार यांनी या पत्रात म्हटलं आहे.
“फळबागा वाचविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले नाही”
“मागील वर्षी राज्यात केवळ ११०० टँकर्स होते. आज ती संख्या ११ हजारांच्या वर गेली आहे. मात्र, या टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्त्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले आाहे. राज्यातील पशूधन धोक्यात आले आहे. पाण्याअभावी फळबागांची परिस्थिती बिकट झाली असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काही प्रयत्न केल्याचे दिसत नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – सोनिया दुहान यांची खंत, “शरद पवार दैवत, पण सुप्रिया सुळे आमच्या लीडर होऊ शकल्या नाहीत, त्यामुळे मी पक्षात..”
राज्य सरकारला दिला इशारा
पुढे बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशाराही दिला. “राज्यातील दुष्काळ निवारणाच्या योजना तळागळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजनादेखील हाती घेतल्या नाहीत. दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेतली आहे. परंतू या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठाण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे आवाहन मी करतो आहे. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिसल्यास मला संघर्षाची भमिका घ्यावी लागेल”, असे ते म्हणाले.