मुस्लीम समुदायासाठी ‘हज यात्रा’ ही अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र धार्मिक यात्रा मानली जाते. या यात्रेसाठी महाराष्ट्रातून लाखो यात्रेकरू हजला जातात. हज यात्रेकरूंना सरकारकडून अनेक प्रकारच्या सुविधाही दिल्या जातात. यावर्षी हज यात्रेला जाण्यासाठी संपूर्ण भारतात एकूण २२ विमानतळांवर एम्बर्केशन पॉइंटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण मुंबई एम्बर्केशन पॉइंटच्या तुलनेत औरंगाबाद एम्बर्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून ८८ हजार रुपये जास्तीचे आकारले जात आहेत. त्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या हज यात्रेकरूंनी याविरोधात आवाज उठवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्री स्मृती इराणी यांना पत्र लिहिलं आहे. मुंबई आणि औरंगाबादवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरूंकडून समान शुल्क आकारलं पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.

शरद पवारांनी पत्रात नेमकं काय म्हटलं?

शरद पवार पत्रात म्हणाले की, या वर्षी अल्पसंख्याक मंत्रालयाने हज यात्रेकरुंसाठी भारतातील २२ विमानतळांची निवड केली आहे. हज समितीने यात्रेकरुंसाठी एम्बार्केशन पॉइंट म्हणून औरंगाबादचीही निवड केली आहे. या एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून अधिकचं शुल्क आकारलं जात आहे, याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छित आहे. मुंबई एम्बार्केशन पॉइंटच्या तुलनेत औरंगाबाद एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाणाऱ्या यात्रेकरुंकडून ८८ हजार रुपये जास्तीचे आकारले जात आहेत.

हेही वाचा- “हज यात्रेकरुंकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कात सवलत द्या”; अजित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील हज यात्रेकरूंनी या विषमतेविरोधात आवाज उठवला आहे. औरंगाबाद एम्बार्केशन पॉइंटवरून हजला जाण्यासाठी लागणारं शुल्क हे मुंबई एम्बार्केशन पॉइंटच्या शुल्काएवढंच असावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे औरंगाबाद एम्बार्केशन पॉइंट आणि नागपूर एम्बार्केशन पॉइंटचं शुल्क मुंबई एम्बार्केशन पॉइंटवर लागू केलेल्या शुल्काच्या बरोबरीने आणल्यास मला आनंद होईल, असं शरद पवार पत्रात म्हणाले.