विधानसभेची निवडणूक दोन ते तीन महिन्यांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय नेते सध्या विविध मतदारसंघाचा दौरा करत आढावा घेत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील पक्षांच्या जागावाटपाबाबतही सध्या खलबतं सुरु आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काहीजण शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तसेच अजित पवारांमुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अस्वस्थता असल्याचंही बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच काही दिवसांपूर्वीच ऑर्गनायझर या मुखपत्रातून अजित पवार यांच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. त्यानंतर आता विवेक या मराठी साप्ताहिकानेही अजित पवारांना महायुतीत घेतल्याबद्दल आक्षेप नोंदविला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व राजकीय घडामोडींवर आज (दि.१७ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं. यावेळी अजित पवार पुन्हा आले तर त्यांना पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी सूचक विधान केलं.

हेही वाचा : Sharad Pawar : “राज ठाकरे महिन्याभराने जागे झाल्यावर…”, शरद पवारांचा पलटवार; म्हणाले, “जनता ज्याची दखल…

शरद पवार काय म्हणाले?

अजित पवार पुन्हा आले तर त्यांना घरात घेणार का? पक्षात जागा आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवारांनी यावर सूचक उत्तर दिलं. शरद पवार म्हणाले, “घरात सर्वांना जागा आहे. पण पक्षात जागा आहे की नाही? याबाबत व्यक्तिगत मी निर्णय घेणार नाही. माझे सर्व सहकारी संघर्षाच्या काळामध्ये माझ्याबरोबर मजबुतीने उभे राहिले. त्यांना पहिल्यांदा विचारेल”, असं सूचक विधान शरद पवार यांनी केलं.

सुप्रिया सुळेंना म्हणून ४० हजारांचं लीड

खासदार सुप्रिया सुळे यांच्या बारामतीतील विजयाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, “मतदारसंघातील लोकांशी तुमचा संवाद कसा आहे? त्यावर बऱ्याच गोष्टी ठरतात. मात्र आता तसा संवाद होत नाही. बारामतीत जर मला कुणी भेटायला आले तर मला त्यांच्या वडीलांचे नाव विचारावे लागते. तेव्हा कळते हा कुणाच्या घरातला आहे. दोन पिढीतील हा संवाद कायम ठेवला तर लोक कधीही नेत्याला विसरत नाहीत. त्यामुळे बारामतीत कुणी काहीही म्हटले तरी मला खात्री होती की सुप्रिया सुळे यांनाच अधिक मतदान होईल. घरातलाच विरोधी उमेदवार असतानाही सुप्रिया सुळे यांना ४० हजारांचं लीड दिलं. त्याचे कारण माझा दोन पिढ्यातील संवाद कारणीभूत आहे”, असं शरद पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawars big statement to ajit pawar join the ncp party and ncp crisis gkt
Show comments