Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याने पक्षांतर्गत तिढा आता संपला आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकांना समोरे जाण्याआधी देशातील एकजुटीला सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन शरद पवारांनी आज केले. राजीनामा मागे घेतल्यानंतर शरद पवार बारामतीला दाखल झाले आहेत. आज त्यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा केली होती. परंतु, या निर्णयाला पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कठोर विरोध केला. अनेकांनी उपोषण केले. त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा, याकरता कार्यकर्ते हट्टाला पेटले होते. तसंच, देशपातळीवर अनेक नेत्यांनीही राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. देशपातळीवर सरकारविरोधात एकजुट तयार करण्यासाठी शरद पवारच नेतृत्त्व करू शकतील, असं म्हटलं जात होतं. विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहणे गरजेचे आहे, असाही सूर लावण्यात आला होता. अखेर, सर्वांच्या विनंतीनंतर शरद पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे. दरम्यान, आता पुढची रणनीती काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पक्षाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी केंद्रपातळीवर लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा >> “तीन जिल्ह्यांत कोणी ओळखत नव्हतं, आता गद्दारीची नोंद…”; उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
“येत्या १०-११ महिन्यांनंतर सर्वत्र निवडणुकांचा माहोल सुरू होईल. त्या काळात इतर प्रश्न बाजूला राहतात आणि निवडणुका अग्रस्थानी येतात”, असं शरद पवार म्हणाले. “नितिश कुमार, अरविंद केजरीवाल, के. चंद्रशेखरराव, ममता बॅनर्जीसह अनेक नेते विरोधकांच्या एकजुटीसाठी प्रयत्न करत आहेत. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम तयार करून विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी माझा सहभाग असेल”, असंही शरद पवार म्हणाले. म्हणजेच, केंद्र पातळीवर मोदी सरकारविरोधात विरोधकांची मोट बांधण्याकरता शरद पवार पुन्हा महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे.