शिवसेनेचे ‘धनुष्य-बाण’ हे निवडणूक चिन्ह गोठवण्याचा हंगामी आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. आयोगाचा हा निर्णय ठाकरे गटासाठी धक्कादायक असून त्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. कालपासून विविध नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी देखील आज औरंगाबादेत प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली.
नक्की वाचा : निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शरद पवार म्हणाले, “निर्णय हे गुणवत्तेवरून घेतल्या जातील याची खात्री हल्ली देता येत नाही. त्यामुळे असं काहीतरी घडेल हे गेले काही दिवस वाचत होतो, ते घडलं. पण असं घडेल असं माझं मन मला सांगत होतं. आता इथून पुढे निवडणुकांना जर सामोरं जायचं असेल आणि शक्तीशाली एखादी संघटना असेल, तर ती जे चिन्ह ठरवेल ते शेवटपर्यंत टिकेलच असं सांगता येणार नाही. त्यामुळे चिन्ह असो अथवा नसो, निवडणुकीला सामोरं जाण्याची तयारी ठेवली पाहिजे.”
हेही वाचा : ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास
आता शिवसेनेसमोर काय पर्याय असणार? या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “आता नवीन चिन्ह घ्यायचं आणि निवडणूक लढवायची. मी स्वत: पहिली निवडणूक लढलो तेव्हा बैल जोडीवर लढलो होतो. दुसरी निवडणूक ही गाय-वासरू या चिन्हावर लढलो होतो. तिसरी निवडणुकीत चिन्ह चरखा होतं. चौथी निवडणूक हाताचा पंजा या चिन्हावर लढलो आणि आता घड्याळ हे चिन्ह आहे. एवढ्या वेगवेगळ्या चिन्हावर मी स्वत: लढलो आहे. आणि त्याचा काही फायदा होत नाही, लोक ठरवतात.”
पाहा व्हिडीओ –
हेही वाचा : “ कितीही आपटली तरी ‘ठाकरे’ नावाचे वलय काढून घेण्यास…”; अंबादास दानवेंची शिंदे गटावर टीका
तर निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शिवसेना संपणार असल्याचं बोललं जात आहे, यावर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवारांनी “शिवसेना अजिबात संपणार नाही, उलट अधिक जोमाने वाढेल. त्यांची जी तरूण पिढी आहे ती जिद्दीने उतरेल आणि ते आपली शक्ती वाढवतील.” असं सांगितलं. तसेच, “या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर परिणाम होण्याचं काहीच कारण नाही. महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस, उद्धव ठाकरे गट शिवसेना आणि राष्ट्रवादी आहे. हे कायम एकत्र राहतील, यात काहीच शंका नाही. आता जी पोटनिवडणूक आहे त्या निवडणुकीला काँग्रेसने पाठिंबा दिला, राष्ट्रवादीनेही पाठिंबा दिला. ” असंही ते म्हणाले.
हेही वाचा : ‘आमचं चिन्ह…’, मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट चर्चेत, ‘तो’ फोटो शेअर करत म्हणाले…!
दोन्ही गटांना नवीन चिन्ह आणि नवीन नाव ठरवायचं आहे, यावर बोलताना शरद पवार यांनी “नावाबाबत मी कोण सांगणार, ते उद्धव ठाकरेच ठरवतील. उद्या शिवसेना(बाळासाहेब ठाकरे) असंही होऊ शकतं. तसेच, शेवटी सत्तेचा गैरवापर करून निवडणुका कोणी लढवत असेल तर लोकांना ते आवडत नाही.” असं पवारांनी बोलून दाखवलं.