Sharad Sonawane Speech In Vidhansabha : विधानसभा निवडणुकीनंतर नागपूरात झालेल्या पहिल्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. या अधिवेशनाची सुरुवात मंत्रिमंडळाच्या शपथविधीने झाली. त्यानंतर काही आमदार मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाल्याचे चित्र होते. तर बीड जिल्ह्यातील सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणाची अधिवेशनात मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाली.

अशात अधिवेशनात पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी विधानसभेत बोलायला संधी मिळाल्यानंतर जोरदार टोलेबाजी केली. आमदार सोनावणे यांच्या भाषणाने संपूर्ण विधानसभा सभागृह खळखळून हसल्याचे पाहायला मिळाले.

माझा पालापाचोळा झाला…

आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा सभागृहात बोलण्याची संधी मिळताच अपक्ष आमदार शरद सोनावणे म्हणाले, “अध्यक्ष महोदय येवढ्या मोठ्या सभागृहात सर्व लोक (सरकार) काठावर आले असते तर माझी किंमत थोडी वाढली असती. पण आम्ही आता पालापाचोळा झालोय. अपक्ष आमदार म्हणून निवडून येणे सोपे नाही. भल्या भल्यांना आडवे करुन यायचे आणि इथे धडक द्यायची दोन मिनिटे बोलायला द्या-दोन मिनिटे बोलायला द्या म्हणून. तुम्हाला माझी किव आली त्याबद्दल आभार मानतो.”

कोण आहेत आमदार शरद सोनावणे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जुन्नरचे माजी आमदार शरद सोनावणे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. यावेळी महायुतीतून जुन्नरची जागा राष्ट्रवादीला (अजित पवार) गेल्यामुळे सोनावणे यांनी विधानसभेची निवडणूक अपक्ष लढवली. यामध्ये त्यांनी विद्यमान आमदार अतुल बेनके आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) सत्यशिल शेरकर यांचा पराभव केला होता. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर आमदार शरद सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता.

हे ही वाचा : “अदृश्य शक्तींनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली”, शवविच्छेदन अहवालावरून जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

मंत्रिपदासाठी केले होते आंदोलन

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर विधानसभेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेले अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळावे म्हणून अनोखे आंदोलन केले होते.

विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शरद सोनावणे यांनी, महायुतीकडून मंत्रिपद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मंत्रिपदाची मागणी करण्यासाठी आमदार शरद सोनावणे विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. यावेळी त्यांच्या हातात असलेल्या फलकावर लिहिले होते की, “यशवंतरावांनी केली किल्ले शिवनेरीवरुन सुरुवात…शिवजन्मभूमीचा करू सन्मान, महायुती देईल मंत्रिमंडळात स्थान.”

Story img Loader